Search This Blog

Sunday, September 18, 2016

घरचा भेदी



मुंबईच्या ताज हॉटेलमधील ती डीनर पार्टी चांगली रंगली होती. कारणही तसेच होते. नॅशनल इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर शामकुमार यांच्या युनिटने उपग्रहातून जमिनीवरील हालचाली अधिक क्षमतेने आकलन करेल असे प्रोटोटाईप यशस्वीरीत्या तयार केले होते आणि त्यांना भारत सरकारकडून पुढील कामासाठी फंडिंग पण मंजूर झाले होते. आज त्यांच्या युनिटचे हे यश साजरे करण्यासाठी सर्वजण जमले होते. शामकुमार यांनी एक छोटेखानी पण छान भाषण केले आणि टीम मधील सर्वांचे आभार मानून ते घरी जाण्यासाठी निघाले. शामकुमार हे नॅशनल इन्स्टिट्यूटच्या सिक्युरिटी आणि रिसर्चचे  सर्वेसर्वा. गेले काही महिने त्यांनी रिसर्चमध्ये स्वतःला अगदी झोकून दिले होते.  गाडीतून जाताना गेले १५ महिने किती कष्ट घेतले हे त्यांना आठवत होते आणि ह्या यशाबद्दल स्वतःचीच पाठ थोपटून घ्यावी असे त्यांना वाटले. आता रात्र बरीच झाली होती आणि दुसऱ्या दिवशी शनिवार (सुट्टी) त्यामुळे घरी पोहोचल्यावर समाधानाने त्यांनी पाठ टेकली.

 सकाळी सकाळी त्यांच्या मोबाईल वाजला. आश्चर्य अधिक चिडचिड अश्या भावनेने त्यांनी फोन उचलला. फोन त्यांच्या ऑफिसमधून होता. फोन वरून त्यांनी जे ऐकलं ते ऐकून त्यांची उरलीसुरली झोप खाडकन उडाली. "तू काही करू नकोस,  मी आलोच" असे सांगून त्यांनी घाई गडबडीने फोन ठेवला आणि पटकन कपडे घालून बाहेर जायला निघाले. अर्ध्या तासात ते ऑफिसला पोहोचले.  सिक्युरिटी डेस्कवर असलेल्या केशवने धावत जाऊन त्यांना सांगितले कि प्रोटोटाईप चोरीला गेला ! शामकुमारच्या पायाखालची जमीनच सरकली . कालपासून केशवच ड्युटीवर होता.  आज सकाळी नेहमीच्या राऊंडला जाताना त्याला लक्षात आलं कि प्रोटोटाईप चोरीला गेला आहे . शामकुमारचे आता डोके गरगरायला लागलं. कोणी चोरला कसा चोरला, शत्रूच्या हातात जर हा प्रोटोटाईप पडला तर अनर्थ होऊ शकतो हे त्यांनी पटकन ताडले आणि  लगेच पोलीस सबकमिशनर पाटील ह्यांना फोन लावला. कालच्या पार्टीत ते सुद्धा होते.  फोनवर सगळी परिस्थती सांगताच त्यातील गांभीर्य पाटील यांच्या लक्षात आलं . हा राष्ट्रीय सुरक्षिततेचा प्रश्न होऊ शकतो हे त्यांनी झटकन ताडलं तेंव्हा ह्या प्रकरणाचा गवगवा होऊ देण्यात अर्थ नव्हता. प्रकरण अतिशय गोपनीयतेने हाताळावे लागणार होते. पाटील ह्यांनी त्या भागातील इनचार्ज असणाऱ्या इन्स्पेक्टर कदमला फोन लावून सर्व परिस्थिती सांगितली आणि हातातील बाकी सर्व केसेस सोडून फक्त ह्या प्रकरणावर लक्ष द्यायला आदेश दिले. कदम आपल्या नेहमीच्या स्टाफसह  घटनास्थळी आले आणि त्यांनी बॅरिकेट्स टाकून लोकेशन सील केले. घटनास्थळाची त्यांनी बारकाईने तपासणी करायला सुरवात केली. कुठेही कसलीही तोडफोड दिसत नव्हती . ह्याचा अर्थ साफ होता कि चोराला ह्या जागेची पूर्ण माहिती होती आणि प्रोटोटाईप ठेवलेल्या जागेपर्यंत तो सहज पोहोचू शकला . त्यांनी केशवला ताब्यात घेऊन काल रात्री काय काय घडलं ते विचारायला सुरवात केली. केशव नेहमीप्रमाणे रात्री ११ वाजता ड्युटीवर आला होता . त्याला हॅन्डओव्हर देऊन त्याच्या आधीचा गार्ड संदीप निघून गेला . आल्याबरोबर केशवने नेहमीप्रमाणे त्याचा राऊंड मारला. त्यावेळी प्रोटोटाईप नेहमीच्या खोलीत होता हे केशवने अगदी शपथेवर सांगितलं. साधारण रात्री १२:३० च्या सुमारास मागच्या बाजूच्या पार्किंगमधून कोणीतरी आत घुसायचा प्रयत्न करत आहे हे केशवने CCTV मध्ये पाहिल आणि त्याची गन घेऊन तो पार्किंगकडे गेला. तिथे जाऊन पाहतो तर कोणीच नव्हतं . थोडा वेळ इकडे तिकडे पाहून कोणीच नाही हे लक्षात येताच तो परत फ्रंट डेस्कवर येऊन बसला. ह्या सगळ्या प्रकाराला साधारण अर्धा तास लागला . पहाटे ४ ला तो राऊंड मारायला गेला असताना त्याच्या लक्षात आले प्रोटोटाईप चोरीला गेलाय आणि त्याने लगेच शामकुमारना फोन लावला . इन्स्पेक्टर कदम ह्यांनी लगेच रात्री ११ ते ४ या दरम्यानचे CCTV फुटेज चेक करायला सुरवात केली पण पाहतात तर काय ! १२ ते १२:५५ ह्या  कालावधीतील फुटेज नाहीसे झाले होते ! ह्याचा अर्थ चोरी ह्याच काळात झाली, केशवच्या ती ४ वाजता लक्षात आली. चोराने नुसता प्रोटोटाईपच चोरला नाही तर CCTV फुटेजपण डिलिट केले होते . ह्याचाच अर्थ चोराला सिस्टिम कशी वापरायची हे देखील माहिती होते . म्हणजेच चोर हा कोणीतरी कंपनीतीलच असण्याची शक्यता आहे असा अंदाज इन्स्पेक्टर कदमनी  बांधला. इन्स्पेक्टर कदम ह्यांनी तात्काळ संदीपला ताब्यात घेण्यासाठी कुमक पाठवली . संदीप त्याच्या बायकोबरोबर कुठे तरी बाहेर जाण्याच्या तयारीत होता. त्याला आणि त्याच्या बायकोला अटक करून लगेच इन्स्पेक्टर कदम यांच्या समोर हजार करण्यात आलं . संदीपला त्यांनी काल रात्री काय काय केलंस ते सांग असं म्हटल्यावर संदीपने सांगितलं कि काल त्याची ड्युटी संपल्यावर तो घरी गेला आणि आज त्याचा त्याच्या बायकोबरोबर कर्नाटकात जायचा बेत होता. त्याच्या बायकोने तिथे कुठल्याश्या देवाला नवस बोललेला होता आणि त्याकरिता म्हणून ते दोघे बाहेर जायला निघाले होते आणि तितक्यात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. इन्स्पेक्टर कदमनी संदीपच्या बायकोला वेगळ्या खोलीत घेऊन जाऊन पुन्हा तेच प्रश्न विचारले . तिनेही आमचे हे ड्युटी संपवून परत आले आणि उद्या लवकर उठ आपल्याला जायचे आहे असे सांगून झोपले असे तिने सांगितले . साधारण किती वाजता संदीप घरी आला असं विचारताच तिने साधारण १:३० वाजला असेल असं सांगितलं. संदीपची ड्युटी तर ११ ला संपते मग १:३० वाजेपर्यंत तो काय करत होता असे संदीपला विचारले तेंव्हा त्याने ओशाळून सांगितले कि तो घराजवळच्या बारमध्ये जाऊन दारू पीत बसला होता आणि त्यामुळे त्याला यायला वेळ झाला . हे ऐकताच संदीपची बायको त्याचा तिथेच उध्दार करू लागली. "तरी मला वाटलंच दारूचा वास येतोय, उद्या देवाला जायचंय, काही काळ वेळ आहे कि नाही, इतका प्रवास आहे उद्या, मी इथे घरी वाट बघतीये, कशाचा काही नाही ह्यांना इ . इ ." संदीप शरमेने चूर झाला होता . इन्स्पेक्टर कदमनी तिला शांत केले आणि दोघांना दुसऱ्या खोलीत थांबायला सांगितले. मग  इन्स्पेक्टर कदम यांनी ती इमारत आणि त्याचा परिसर पूर्ण पिंजून काढला पण काहीच मिळाले नाही. अगदी शेवटी त्यांना इमारतीच्या दरवाज्याच्या बाजूला असलेल्या एका ट्रॅश मध्ये एक वरील कव्हर फुटलेला असा युसबी पेन ड्राईव्ह मिळाला. त्यांनी घाई घाईनी तो कॉम्प्युटर ला जोडला तेव्हा तो करप्ट आहे असा मेसेज कॉम्प्युटरवर आला.

आता काय करावे हे इन्स्पेक्टर कदमना सुचेना. त्यांनी विचार करायला सुरवात केली . एकच इमारत, त्यातून आत येण्यासाठी हा दरवाजा, आल्या आल्या फ्रंट डेस्क , तिथे एक कॉम्पुटर आणि तिथेच गार्ड बसतो. इमारतीत कुठेही जायचे असल्यास गार्ड समोरूनच जावे लागते. रात्रीची वेळ त्यामुळे ऑफिसमध्ये कोणी कर्मचारी नाही , कुठेही तोडफोड अगर मोडतोड नाही. अगदी अलगद प्रोटोटाईप चोरीला गेला होता आणि बरोबर फुटेजदेखील . मिळाला तो फक्त एक युसबी ड्राईव्ह जो उपयोगाचा नाहीये. केशवला आणि संदीपला तर ताब्यात घेतले आहे पण दोघेही काहीच सांगत नाहीयेत. शिवाय त्यांच्याविरुध्द्व असे काही पुरावे पण मिळत नाहीयेत .  पाटील साहेबांचा फोन आल्यावर काय सांगायचे आता ? मदतीसाठी आणखी कुमक पण मागवता येत नाहीये कारण ही केस गुप्तपणे हाताळण्याचे आदेश आहेत . जसा जसा वेळ जात होता तस चोराला पकडणे कठीण होत जाणार हे स्पष्ट दिसत होतं . ह्यात चोराने तो प्रोटोटाईप देशाच्या शत्रूला विकला तर ? शत्रू तर हवी तेवढी किंमत देऊन ते विकत घेईल. आणि असा खरोखर झाल तर भारताच्या सुरक्षिततेला एक मोठे आव्हान निर्माण झाले असते.  कदम यांच्या आयुष्यातील ही सर्वात क्रिटिकल केस होती. त्यांच्या डोळ्यात निराशा दाटून आली . आता काय करावे हा विचार करत असतानाच कदम यांचा फोन वाजला . त्यांनी फोन उचलताच त्याचा आपल्या कानावर विश्वास बसेना. पलीकडून थेट दिल्लीहून भारताचे संरक्षण मंत्री श्री. भट  बोलत होते ! कदम क्षणभर जागेवरून उडालेच , पण लगेच स्वतःला सावरून त्यांनी बोलायला सुरवात केली. पाटील साहेब आणि त्याच्या वरिष्ठांकडून प्रकरण कळल्याचे भट ह्यांनी सांगितले . भट ह्यांनी हे प्रकरण किती महत्वाचे आहे हे कदम ह्यांना पुन्हा एकदा सांगितले आणि हे गोपनीय ठेवण्याविषयी आदेश दिले परंतु त्याच बरोबर मदत करायची देखील तयारी दाखवली. स्वतःचा थेट फोन नंबर दिला आणि पुढे काय करणार आहे असा विचारल. कदम यांच्याकडे सांगण्यासारखे फारसे काही नव्हतेच . केशव आणि संदीपला ताब्यात घेतले आहे आणि एक युसबी मिळाला आहे इतकच ते बोलले . बोलता बोलता त्यांना आपला  कॉम्प्युटर फॉरेन्सिक एक्स्पर्ट मित्र विश्वजीत म्हणजेच जित्या ची आठवण झाली. कदाचित तो ह्या प्रकरणात आपल्याला मदत करू शकेल असे त्यांना वाटले. कदमनी श्री भट यांना विश्वजीतबाबत सांगितले आणि त्याला ह्या केस मध्ये सहभागी करण्याविषयी सुचवले . भट यांना ह्या केस मध्ये जितकी कमी माणसे गुंततील तितके हवे होते. कदमनी पूर्ण परिस्थिती सांगितली आणि सध्या विश्वजीत ची मदत घेण्यावाचून पर्याय नाही हे निक्षून सांगितल्यावर श्री भट यांनी तशी परवानगी दिली पण विश्वजीतला गोपनीयतेची शपथ देणे आणि आणखी कोणालाही सामील करायचे असल्यास प्रथम श्री भट यांना सांगणे ह्या बोलीवरती ! श्री भट यांच्याशी फोन होताच क्षणभर कदम यांनी आपल्या कपाळावरील घाम टिपला. ताण असह्य होत होता . एक ग्लास पाणी प्यायल्यावर मग जरा त्यांना जरा बरे वाटले. लगेच त्यांनी कॉम्पुटर फॉरेन्सिक एक्सपर्ट जित्या ऊर्फ विश्वजीतला फोन लावला .

विश्वजीतची स्वारी आज शनिवार सकाळ म्हटल्यावर अजून बेडमध्येच होती.  इकडे इन्स्पेक्टर कदमचे ३ फोन येऊन गेले आणि विश्वजितला ह्याचा पत्ताच नव्हता. आता शेवटचा प्रयत्न नाहीतर थेट विश्वजीतच्या घरी जायचं असा ठरवून कदमनी पुन्हा फोन केला . विश्वजितने आळसावलेल्या आवाजात फोनउचलला . कदमनी तुझ्या मदतीची गरज आहे, ताबडतोब नॅशनल इन्स्टिट्यूटला निघून ये असं सांगितल्यावर त्याने चक्क नाही म्हणून फोन ठेवून दिला . कदमची तळपायाची आग मस्तकात गेली . पण रागावरती नियंत्रण ठेवून त्यांनी पुन्हा विश्वजीतला फोन लावला  आणि आर्जवे करत आपल्या दोस्तीची शपथ घातली . विश्वजीतची स्वारी शेवटी कुरकुरत उद्याच्या रविवारी रात्री मस्त जेवण आणि डबल ब्लॅकचा खंबा देण्याच्या बोलीवर तयार झाली .

विश्वजीत आपल्या फॉरेन्सिक किटसह नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये आला. इन्स्पेक्टर कदम त्याचीच वाट बघत होते . येताच काही मिनिटात कदमनी परिस्थिती विश्वजीतला सांगितली आणि त्याबरोबर भारत सरकारचे आपल्याला पूर्ण पाठबळ आहे हे देखील सांगितले . विश्वजीतने तो युसबी ताब्यात घेतला आणि फ्रंट डेस्कच्या कॉम्पुटरची फॉरेन्सिकली साऊंड इमेज केली. बाजूच्या खोलीत त्याने माहितीच्या पृथ्थकरणासाठी फॉरेन्सिक टूल्स सेट केली आणि तो सांगेपर्यंत अजिबात डिस्टर्ब करायचे नाही असे सांगितले  . फॉरेन्सिक ऍनालिसिस प्रोग्रॅमने विश्वजीतच्या शक्तिशाली कॉम्प्युटरच्या साहाय्याने गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण करायला सुरवात केली.

सर्वात प्रथम विश्वजीतने शोधून काढले कि ह्या कॉम्पुटरवर ४ युजर्स आहेत. संदीप, केशव आणखी दोघे जण. म्हणजे ४ जणांमध्ये हा कॉम्पुटर वापरला जात होता. विश्वजीतने विचारणा केली असता कळले कि इतर दोघे २ दिवस सुट्टीवर आहेत त्यामुळे केशव आणि संदीपचं आलटून पालटून ड्युटी करत आहेत . मग विश्वजीतने सिस्टिमची लॉगइन इन्फॉर्मशन चेक करायला सुरवात केली आणि बिंगो ... १२:३३ ला संदीपच्या प्रोफाइल ने लॉगइन केलेले दिसत होते. आणि १२: ५५ ला लॉगऑऊट ! ह्यामुळे संदिपवरचा संशय बळावला पण संदीपचा अकॉउंट वापरून दुसऱ्या कोणीतरी देखील लॉगइन केलं असण्याची शक्यता होती त्यामुळे विश्वजीतने आणखी  विश्लेषण करायला सुरवात केली . त्या मोडक्या युसबी ड्राईव्हवरून माहिती रिकव्हर करण्यात विश्वजीतला यश आले. त्या युसबी मध्ये फक्त एक फाईल होती ज्यात एक की आणी पासवर्ड होता. विश्वजीतने  त्याच्या अनुभवावरून ताडले कि हा बिटलॉकरचा पासवर्ड आहे . बिटलॉकर हे सॉफ्टवेअर पार्टीशन एनक्रिप्ट करायला वापरले जाते हे त्याला माहित होते . त्याने लगेच ह्या कॉम्पुटर मध्ये बिटलॉकरशी संबंधित पार्टीशन आहे का हे पाहायला सुरवात केली पण थोड्या वेळातच त्याला कळले कि अशी कोणतीही माहिती अगर पार्टीशन कॉम्पुटरवर नाहीये . ह्याचा अर्थ नक्कीच एखादा दुसरा कॉम्पुटर आहे ज्याचा हा बिटलॉकर पासवर्ड आहे .पण असा दुसरा कॉम्पुटर कोणता? विश्वजीतने आणखी माहिती शोधायला सुरवात केली .

त्याने संदीपचे ई-मेल चेक करायला सुरवात केली. बरेच शोधल्यावर त्याला असे लक्षात आले कि सॅमन्था म्हणून कोणी तरी आहे जिने संदीपला अनेकदा भेटायला बोलावले आहे. थोडी चौकशी केल्यावर लक्षात आले कि सॅमन्था हि त्याच कंपनीत टेकनिकल विभागात कामाला आहे. मग विश्वजीतने संदीप आणि सॅमन्था ह्या दोघांमधील इमेल्स चेक करायला सुरवात केली . काही इमेल्स हे संशयास्पद होते ज्यात सॅमन्थाने तुझी आता आयुष्यभराची चिंता दूर  होईल, तुला तुझे भाग्य उजळवायचे आहे का ? अशी विचारणा केली होती. ह्यावरून विश्वजीतचा संदिपवरील संशय अधिक पक्का झाला आणि आता पुरेसा पुरावा देखील हातात होता . त्याने लॉगइन ची माहिती आणि ते इमेल्स ह्यांची प्रिंट काढून इन्स्पेक्टर कदमना माहिती दिली. कदम ह्यांच्याकडे आता पुरेशी माहिती आली होती आणि आता त्यांच्या डोळ्यातील निराशेची जागा एकदम नव्या उमेदीने घेतली .  कदम यांनी संदीपला एका खोलीत बोलावले आणि काल  रात्री काय झाले हे पुन्हा खडसावून विचारले. संदीपने आधीचीच गोष्ट पुन्हा सांगायला सुरवात केल्यावर इन्स्पेक्टर कदम यांनी संदीपच्या २ श्रीमुखात भडकावल्या आणी त्याच्या समोर इमेल्सच्या प्रिंट आऊट आणि  लॉगइनची माहिती ठेवत पुन्हा खडसावून विचारले आणि खोटं बोलल्यास किती वाईट परिणाम होऊ शकतात ह्याची धमकी दिली . तेंव्हा संदीप पोपटासारखा बोलू लागला.

 सॅमन्था हि अतिशय आकर्षक व्यक्तिमत्वाची स्त्री होती. ड्युटीवर असताना संदीप तिला रोज बघायचा.तिच्यावर खरे तर तो फिदाच होता.  काही आठवड्यांपूर्वी सॅमन्थाने संदीपशी ओळख वाढवली. तिने त्याला एका ठिकाणी भेटायला बोलावले होते . तिथे तिने प्रोटोटाईप चोरून तिच्या स्वाधीन करण्याची कल्पना त्याला दिली. त्याबदल्यात खूप मोठी रक्कम देण्याचे कबूल केले. तिचे ते सौंदर्य, मधाळ आवाज आणि भली मोठी रक्कम ह्या सर्वांनी संदीपला भुरळ घातली. रक्कम इतकी मोठी होती कि इथून पुढे संदीप आरामात बसून खाऊ शकला असता . सॅमन्थासाठी संदीपने हे कबूल केलं आणि त्या दिवशी ड्युटी संपल्यावर तो बाजूच्याच बार मध्ये दारू पीत बसला. ठरल्याप्रमाणे सॅमन्था १२ वाजता आली आणि ते दोघे कंपनीकडे जायला निघाले. लांबून केशववर संदीप लक्ष ठेवून होता आणि एक घोगडें पांघरून मागच्या पार्किंगच्या तिथे सॅमन्थाने खुडबूड सुरु केली. अपेक्षेप्रमाणे केशव तिकडे यायला निघाला तेंव्हा संदीपने सॅमन्था ला मिस्ड कॉल दिला आणि लगेच इमारतीत प्रवेश करून प्रोटोटाईप चोरला, फ्रंट डेस्कच्या कॉम्पुटरवर लॉगिन केले आणि CCTV फुटेज डिलिट केले, लॉगऑऊट करून केशव यायच्या आत तिथून पोबारा केला. इकडे संदीपचा मिस्ड कॉल आल्यावर सॅमन्था ने देखील पोबारा केला. केशव तिकडे येत असल्याची हि खूण होती. संदीप आणि सॅमन्था ठरलेल्या ठिकाणी भेटले आणि संदीपने तो प्रोटोटाईप सॅमन्थाला दिला आणि त्या बदल्यात मिळणारी निम्मी रक्कम सॅमन्थाने त्याला दिली आणि उरलेली उद्यापर्यंत त्याच्या कर्नाटकातील पत्त्यावर पोहोचेल असे सांगितले. खर्चाला थोडे पैसे संदीपला देऊन आणि प्रोटोटाईप  घेऊन सॅमन्था निघून गेली आणि संदीप घरी आला. नवस पूर्ण करण्याच्या बहाण्यानं कर्नाटकात जायचे आणि पूर्ण पैसे मिळाले कि दक्षिणेच्या एखाद्या राज्यात कायमचे जाण्याचा विचार संदीपचा होता. सॅमन्था कुठे गेली असेल काय करेल ह्याचा मात्र संदीपला अजिबात अंदाज नव्हता.
इन्स्पेक्टर कदम यांना पहिल यश मिळालं ते म्हणजे चोर सापडला पण त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे प्रोटोटाईप अजून मिळाला नव्हता . त्यांनी लगेच पाटील ह्यांना हि सर्व माहिती दिली आणि पुढील तपासाला सुरवात केली. सॅमन्थाच्या घराला कुलूप होतं आणि फोन स्विच ऑफ येत होता. शेजारी चौकशी केली असता ती कालपासूनच घरी आलेली नाही असं कळलं.               

विश्वजीतला आता सॅमन्थाच्या ऑफिसमधील कॉम्पुटरचा ऍक्सेस देण्यात आला. विश्वजीतने आता सॅमन्थाच्या कॉम्पुटरची फॉरेन्सिकली साऊंड इमेज केली आणि माहितीचे विश्लेषण करायला सुरवात केली. सर्व प्रथम त्याने सॅमन्थाचे इमेल्स चेक करायला सुरवात केली. तिच्या कॉम्पुटरवर जवळ जवळ १,२०,००० इमेल्स होते. आणि तिने जवळ जवळ ४३ जणांशी ई-मेल संभाषण केले होते. आता इतक्या इमेल्स मधून हवा तो ई-मेल कसा शोधून काढायचा ? विश्वजीतने त्याच्या फॉरेंसिकच्या अनुभवाचा वापर करायला सुरवात केली. प्रथम त्याने टाइम लाईन ठरवली आणि फक्त गेल्या ६ महिन्यातील इमेल्सवर भर द्यायचे ठरवले. त्यामुळे एकूण इमेल्स राहिले ४०,०००. मग त्याने संदीप आणि सॅमन्था ह्यांच्यातील इमेल्स चा बारकाईने अभ्यास करायला सुरवात केली आणि काही कीवर्ड शोधून काढले. मग त्या ४०,००० इमेल्स मधून त्या  कीवर्डशी संबंधित असे जवळ जवळ २०० इमेल्स मिळाले आणि त्यात त्याला कळले कि सॅमन्था निकी नावाच्या व्यक्तीशी प्रोटोटाईप संदर्भात बोलत आहे. विश्वजीतने मग सॅमन्था आणि निकी ह्यांच्यातील इमेल्स वर लक्ष द्यायला सुरवात केली.आणि ते इमेल्स वाचून त्याला कळले कि निकीदेखील ह्या प्रकरणाशी संबंधित आहे. निकी हा कंट्रोलिंग युनिटचा प्रमुख होता आणि त्याचे आणि सॅमन्थाचे जवळचे संबंध होते. निकी आणि सॅमन्थाच्या इमेल्स मध्ये हे कळून चिकले कि निकीने सॅमन्थाला " ते टोकन " पाठव असे सांगितले होते आणि त्या नंतर आपले स्वप्न साकार होण्याचा दिवस आता जवळ येत आहे , टोकन आवडले आता मुख्य पाककृती ची वेळ जवळ आली अश्या पद्धतीचे इमेल्स पाठवले होते. मुख्य पाककृती म्हणजे तो प्रोटोटाईप हे जवळ जवळ निश्चित होते पण टोकन म्हणजे काय ? ह्याचा अर्थ आणखी काही तरी चोरीला गेले आहे काय ? ते कदाचित प्रोटोटाईपशी निगडित असेल काय ? हा विचार आता विश्वजितच्या डोक्यात सुरु झाला आणि तितक्यात त्याला त्या युसबीची आठवण झाली. त्याने सॅमन्थाच्या कॉम्पुटरवर पहिले तर त्याला अनअलोकाटेड सेक्टर्स आढळून आले . घाईघाईने सॅमन्थाच्या कॉम्पुटरवरील अनअलोकाटेड सेक्टर्स रीकॉन्स्ट्रक्ट केले आणि युसबी वरील बिटलॉकर पासवर्ड टाकला आणि बिंगो ! तिच्या कॉम्पुटर वरील डिलिट केलेल्या पार्टीशनवरील डेटा आता दिसू लागला. विश्वजीतने तपासमधील एक अतिशय महत्वाची पायरी गाठली होती. तो आता रिकव्हर केलेल्या पार्टीशनवरील डेटाचे विश्लेषण करू लागला. तिथे त्याला scan.file  अशी एक फाईल दिसली जिला पासवर्ड देऊन एनक्रिप्ट केलं होतं . आता २ गोष्टी गरजेच्या होत्या , हि फाईल कशी एनक्रिप्ट केली (कोणता प्रोग्राम वापरून ) आणि पासवर्ड काय असेल ? ज्या अर्थी फाईल एनक्रिप्ट केली त्या अर्थी एखादे एनक्रिप्ट करणारे सॉफ्टवेअर नक्की ह्या कॉम्पुटर वर असले पाहिजे. विश्वजीतने प्रोग्रॅम फाइल्स चेक करायला सुरवात केली तर तिथे एनक्रिप्ट करणारे कोणतेही सॉफ्टवेअर नव्हते . त्याने इतर कोणते प्रोग्रॅम्स (standalone ) होते हे चेक केले पण तिथेही काही संशयास्पद नव्हते. विश्वजीतने आता आपले फॉरेंसिकचे ज्ञान पणाला लावले. विंडोजच्या रेजिस्ट्री मध्ये जाऊन त्याने चेक करायला सुरवात केली. आणि तिथे त्याला एक लिंक फाईल दिसली ज्यामुळे हे कळलं कि डेस्कटॉप वरील काही आयकॉन्स डिलीट केले गेले आहेत . विश्वजीतने मग रिकव्हरी प्रोग्रॅम सुरु केला आणि डिलिट केलेला डेटा परत मिळवला . त्यात त्याला असे दिसून आले कि तिथे Truecrypt नावाचे सॉफ्टवेअर होते जे डिलीट करण्यात आले आणि हे सॉफ्टवेअर डेटा एनक्रिप्ट करायला वापरतात. चला म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं कि हि फाईल Truecrypt वापरून एनक्रिप्ट करण्यात आली आहे , पण पुढे काय? पासवर्ड कसा मिळवणार ? पासवर्ड क्रॅक करणाऱ्या सॉफ्टवेअरला ती एनक्रिप्टेड फाईल दिली असता पासवर्ड हा कॉम्प्लेक्स आहे आणि हा क्रॅक करायला ७ दिवस लागतील असा संदेश आला . साहजिकच तितका वेळ विश्वजितकडे नव्हता . त्याने पुन्हा निकी आणि सॅमन्था ह्यांच्यातील संभाषणावर लक्ष द्यायला सुरवात केली , कदाचित तिथे काही क्लू मिळेल ?

त्या दोघांच्या संभाषणात अनेकदा बाहेर जेवायला जाण्याचे इमेल्स होते. बऱ्याचदा ते इटालिया ह्या हॉटेल मध्ये जातात हे विश्वजीतला कळले . सॅमन्थाला Alfredo पास्ता खूप आवडतो हे हि तिने ई-मेल मधून निकीला सांगितले होते . बरयाचदा ती Alfredo च्या उल्लेख my favorite असा करत असे. विश्वजित अक्षरशः डोळ्यात तेल घालून प्रत्येक ई-मेल वाचत होता आणि त्याला अचानक एक ई-मेल मिळाला ज्यात निकीने सॅमन्थाला टोकन मिळाले, धन्यवाद आणि टोकन खूप आवडले असा उल्लेख केला होता आणि त्या बरोबरच टोकन सुरक्षित ठेव असा सल्ला पण सॅमन्थाला दिला होता . त्यावर सॅमन्थाने काळजी नको निक , इट इस my favorite असा रिप्लाय दिला होता. विश्वजीतच्या डोक्यात अचानक ट्यूब पेटली आणि त्याने चटकन truecrypt त्याच्या कॉम्पुटरवर इन्स्टॉल केले आणि ती फाईल उघडून Alfedro, AlfredoPasta , Alfrdo_Pasta ,alfredoPasta PastaAlfredo असे कॉम्बिनेशन पासवर्ड म्हणून वापरून पहायला सुरवात केली आणि  बिंगो.... त्यातील एका पासवर्डने फाईल ओपन झाली. ह्यात नशिबाचा भाग खूप होता पण म्हणतात ना कि प्रयत्न करणाऱ्याला नशिबाची साथ असते !खालील फोटो त्या फाईलमध्ये होते . प्रोटोटाईपच्या ह्या ब्लूप्रिंट होत्या.  टोकन म्हणजे ह्या ब्लूप्रिंट्स आणि मुख्य पाककृती म्हणजे तो प्रोटोटाईप हे कळले. ह्या ब्लूप्रिंट्स सॅमन्थाने निकीला पाठवल्या होत्या. 






विश्वजीतने आता मोर्च्या निकीच्या ऑफिसकडे वळवला. तिच्या ऑफिस मधील कॉम्प्युटरचे आता फॉरेन्सिक ऍनालिसिस करायला त्याने सुरवात केली . सुरवातीलाच त्याने प्रोटोटाईप आणि त्याच्या संबधीचे इमेल्स ह्यावर लक्ष द्यायला सुरवात केली. तेव्हा त्याला असे लक्षात आले कि स्वित्झलँड मधील स्टारलाईट कंपनीच्या CEO नी म्हणजे निकोलसनी निकीकडे प्रोटोटाईप विषयीची ऑफर दिली होती. निकीने त्याला आश्वासन दिले आणि टोकन देण्याच्या मोबदल्यात म्हणून काही पैसे द्यायला सांगितले आणि त्या बदल्यात त्याला टोकन म्हणजेच त्या ब्लूप्रिंट्स पाठवल्या. म्हणजे आता खरेदीदार कोण हे देखील कळले आणि ह्या सर्व कटात कोण कोण सहभागी आहे हे देखील. तथापि अद्याप प्रोटोटाईप कुठे आहे आणि तो कसा मिळवता येईल ह्याची काहीच माहिती नव्हती . इन्स्पेक्टर कदम यांनी विश्वजीतला सॅमन्था घरी नसल्याची बातमी दिली तेंव्हा त्याने निकीविषयी सांगितले. कदम नी घाईने निकीच्या घराकडे साध्या वेशातील पोलीस पाठवले तेव्हा निकीदेखील घरी नसल्याचे कळले आणि त्याचा पण फोन स्विच ऑफ येत होता. ह्यावरून सॅमन्था आणि निकी हे सोबतच कुठे तरी पळून गेले असावेत असा संशय इन्स्पेक्टर कदमना आला . तपास पुढे सरकत होता पण अजून प्रोटोटाईप कुठे आहे ह्या विषयीची काहीच माहिती मिळत नव्हती. 

इतक्यात दिल्लीवरून इन्सपेक्टर कदम यांना  फोन  आला. श्री भट यांनी तपासाच्या प्रगतीची चौकशी केली. चोर कोण आहेत हे कळल्याचे समजताच त्यांना खूप आनंद झाला पण प्रोटोटाईपविषयी अजून काही माहिती नाही हे कळताच त्याचा स्वर थोडा चिंतेचा झाला . Time is of essence inspector , असे म्हणून त्यांनी विश्वजीतला फोन द्यायला सांगितले. विश्वजीतला त्यांनी आतापर्यंतच्या कामासाठी शाबासकी दिली आणि लवकरात लवकर प्रोटोटाईपचा शोध लाव , तुला ज्या गोष्टीची आवश्यकता असेल ती मिळेल असे सांगितले. विश्वजीतने त्यांचे आभार मानून पुन्हा कामाला सुरवात केली.  आणि इतक्यात तिथे पाटील साहेब आणि शामकुमार देखील आले. शामकुमार ह्यांना आपली सिक्युरीटी इतकी तकलादू कशी , फ्रंट डेस्कच्या लोकांना प्रोटोटाईप पर्यंत जायला कशाला ऍक्सेस ठेवले, साधा फ्रंट डेस्क चा माणूस CCTV फुटेज डिलीट करतो म्हणजे काय ? फक्त रिसर्चकडेच लक्ष देता देता सिक्युरिटीकडे आपले दुर्लक्ष झाले होते का ? असे अनेक प्रश्न पडले होते पण वेळ तो विचार करण्याची नव्हती. प्रोटोटाईप परत मिळताच पूर्ण सिक्युरिटीची पुनर्रचना करण्याचे त्यांनी ठरवले.  

तर शेवटच्या मिळालेल्या धाग्यानुसार निकोलसने निकीला पैसे दिले होते त्यामुळे विश्वजीतने त्या दिशेने ऍनालिसिस ला सुरवात केली . मनी , बँक, क्रेडीटेड अश्या की वर्ड्सनी आणि निकोलसशी निकीचे बोलणे झाले त्या कालावधीच्या आसपासचे त्याने निकीचे इमेल्स शोधायला सुरवात केली आणि बिंगो ..... बँक ऑफ बेस्टोनिया कडून निकीच्या अकाउंट मध्ये साधारण १,०००,००० डॉलर्स जमा झाल्याचा ई-मेल त्याला मिळाला. त्याने ही बातमी लगेच इन्स्पेक्टर कदम यांना सांगितली आणि बँक ऑफ बेस्टोनियाशी तात्काळ संपर्क करून देण्याविषयी सुचवले . कदम यांनी श्री भट यांना फोन लावला आणि लगेच चक्रे फिरली . बँक ऑफ बेस्टोनिया मधील एका बड्या पदाधिकाऱ्यांशी विश्वजीतचा फोन जोडून देण्यात आला . विश्वजीतने त्या १,०००,००० डॉलर्स च्या व्यवहाराविषयी चौकशी केली तर ते निकीच्या नवीनच उघडलेल्या अकाउंट मध्ये अमुक अमुक तारखेला जमा झाले आहेत असे त्या अधिकाऱ्याने सांगितले . विश्वजीतने ह्या खात्याविषयी इतर माहिती विचारताच हे कळले कि बेस्टोनिया देशातमध्ये निकीने बीच हाऊस विकत घेतले आहे आणि त्यासाठी निकीने बँकेकडून ५,०००,००० डॉलर्स चे गृह कर्ज घेतले आहे.  विश्वजीतने त्या अधिकाऱ्याचे आभार मानून फोन ठेवला आणि त्याच्या लक्षात आले कि निकी आणि सॅमन्था बेस्टोनियाला पळून जाण्याच्या प्रयत्नात असू शकतील आणि त्याने लगेच एअरपोर्ट ऑथोरोटी ऑफ इंडियाकडे भारतातून बेस्टोनिया ला जाणाऱ्या गेल्या २ आठवड्यापासून ची आणि आजची अशी प्रवाशांची यादी पाहून त्यात निकी आणि सॅमन्था चे नाव आहे का हे पाहायला सांगितले. श्री भट ह्यांच्या प्रभावामुळे लगेच उत्तर आले आणि त्यात असे कळले कि आजच्या सकाळच्या मुंबई - बेस्टोनिया विमानात ह्या दोघांचे आरक्षण होते. विश्वजीतने लगेच मुंबई एअरपोर्टला फोन लावला आणि एअरपोर्टच्या अधिकाऱ्याकडून उत्तर आले कि विमानाने कधीच टेक ऑफ केला आहे आणि आता विमान भारतीय हवाई हद्दीच्या बाहेर आहे त्यामुळे ते आता काहीच करू शकत नाहीत . हे कळताच इन्स्पेक्टर कदम यांची भयंकर चिडचिड झाली. जवळ जवळ हातात आलेली केस आता निसटून जाते कि काय असे त्यांना वाटू लागले. त्यांनी पुन्हा श्री भट यांना फोन लावला आणि परिस्थिती सांगितली. श्री भट यांनी मी पाहतो काय करता येत ते, अस सांगून फोन ठेवला. पुढील ३० मिनिटे कदम, पाटील आणि विश्वजीत साठी अतिशय तणावपूर्ण गेली. विश्वजीतने जितकं करता येईल तितकं सगळं केलं होतं , आता सगळं श्री भट काय करतात ह्यावर अवलंबून होतं . खोलीत कोणीच काही बोलत नव्हतं , एकमेकांचे श्वास ऐकू येतील इतकी शांतता ! आणि इतक्यात इन्स्पेक्टर कदमचा फोन वाजला . त्यांनी घाई घाईनी तो उचलला आणि त्यांच्याभोवती पाटीलसाहेब , विश्वजीत, शामकुमार ह्यांनी गर्दी केली. सगळेजण श्री भट कदम ह्यांना काय सांगत आहेत ह्याकडे प्राण कानात ओतून ऐकू लागले. श्री भट यांनी एक ई-मेल ऍड्रेस दिला आणि विश्वजीतला प्रोटोटाईपच्या ब्लूप्रिंट त्या ई-मेलवर पाठवायला सांगितले आणि फोन ठेवून दिला . विश्वजीतने लगेच ते पाठवले आणि सगळे जण आता अधीर होऊन पुढे काय होणार ह्याची वाट पाहू लागले. श्री भट ह्यांनी नक्की काय केले, आता पुढे काय होणार ह्याची काहीच कल्पना नसल्याने वातावरण अतिशय तणावपूर्ण बनले. अशीच काही मिनिटे गेली आणि थोड्या वेळात पुन्हा इन्स्पेक्टर कदम यांचा फोन वाजला. निकी आणि सॅमन्था ह्यांना बेस्टोनिया पोलिसांनी अटक केली होती आणि त्यांच्या कडून प्रोटोटाईप देखील जप्त केला . सगळ्यांनी आनंदाने हुर्रे असे ओरडायला सुरवात केली. मनावरचा सगळं ताण अचानक कमी झाला होता. सगळ्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले होते. श्री भट ह्यांनी बेस्टोनियातील भारतीय वकिलातीकडून निकी आणि सॅमन्थासाठी वॉरंट जारी केले होते आणि तिथल्या पोलिसांना प्रोटोटाईपचे फोटो पाठवून तो प्रोटोटाईप निकी / सॅमन्था ह्यांच्या सामानात शोधायला सांगितला होता . बेस्टोनिया पोलिसांनी चोख कामगिरी बजावली आणि बेस्टोनिया एअरपोर्टवरच निकी आणि सॅमन्थाला अटक केली , सामानाच्या झडतीमध्ये तो प्रोटोटाईप मिळाला !

यथावकाश निकी आणि सॅमन्थाला भारतात आणलं आणि चौकशीत निकीने गुन्हा कबूल करत सांगितलं कि हा सर्व त्याचा प्लॅन होता. निकोलसकडून विचारणा झाल्यावर हा प्लॅन प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याला सॅमन्थाची मदत घ्यावी लागली. अर्धी रक्कम देण्याच्या बोलीवर सॅमन्था तयार झाली .  सॅमन्था तांत्रिकदृष्या प्रवीण होती आणि तिने ह्या कामासाठी संदीपला तयार करण्याचे ठरवले. प्रथम निकोलसचा विश्वास संपादित करण्यासाठी सॅमन्थाने ब्लूप्रिंटचे फोटो काढले.  ते एनक्रिप्ट करून आपल्या कॉम्पुटरवरून निकीला पाठवले आणि निकीने ते निकोलसला पाठवले आणि सॅमन्थाने फोनवरून निकोलासला ते कसे  बघायचे हे सांगितले . निकोलसने खूष  होऊन ठरलेले पैसे निकीला पाठवले आणि प्रत्यक्ष प्रोटोटाईपसाठी डील फायनल केले . सॅमन्थाने मग तिच्या कॉम्पुटरवरील ते एनक्रिप्ट केलेले फोटो ज्या बिटलॉकरने एनक्रिप्ट केलेल्या पार्टीशन वर होते त्या पार्टीशनची की युसबीवर कॉपी केली आणि ते पार्टीशन डिलीट केले . एन्क्रिप्शन सॉफ्टवेअर Truecrypt  देखील uninstall केले .बिटलॉकर पार्टीशनची की युसबी मध्ये होती पण बेस्टोनियाला जायचा प्लॅन झाल्यावर तिने तो युसबी आपटून नष्ट करायचा प्रयत्न केला, त्यात युसबीचे बाहेरचे कव्हर तुटले , कंपनीतून बाहेर जाताना तिने घाई घाईत तो युसबी ट्रॅशमध्ये टाकला आणि ती निघाली. चोरी झाल्यावर तो प्रोटोटाईप संदीपकडून घेऊन ती निकीला ठरलेल्या ठिकाणी भेटली आणि तिथून दोघांनी एअरपोर्ट कडे प्रयाण केले . जसे विमान सुटले आणि भारतापासून लांब लांब गेले तसे दोघांनी विमानात चिर्स केले आणि भविष्याची स्वप्ने पाहू लागले . बेस्टोनियात लँड होताच त्यांना वाटले कि आपण बाजी जिंकली, परंतु भारत सरकार , महाराष्ट्र पोलीस आणि विश्वजीतसारखे लोक हे देशासाठी काय करू शकतात ह्याची त्यांना कल्पना नव्हती . लँड होताच  पाहतात तर काय, बेस्टोनिया  पोलीस त्यांच्या स्वागतासाठी उभे ! तिथून पुढे काय झाला हे सर्वांना माहितीच आहे.

पुढे निकोलसच्या नावाने वॉरंट निघून त्यालाही अटक करण्यात आली आणि ह्या पूर्ण प्रकरणावरती पडदा पडला. विश्वजीत आणि त्याच्या डिजिटल फॉरेन्सिकच्या मदतीने आणखी एक गुन्हा उघडकीला आला होता आणि देशाचे फारसे नुकसान न होता गुन्हेगार जेरबंद झाले होते. इन्स्पेक्टर कदम ह्यांचा जित्या आता डिटेक्टिव्ह विश्वजीत झाला होता !