Search This Blog

Sunday, June 26, 2016

हे असं का ? concept of monality vs duality

आज जागतिकीकरणाच्या युगात अनेक जण आज पूर्वेकडील देशातून पश्चिमेकडील देशात आणि पश्चिमेकडील लोक पूर्वेकडच्या देशात विविध कारणामुळे येतात. अश्या वेगळ्या देशात आल्यावर आपल्याला अनेक फरक जाणवू लागतात. भौगोलिक, हवामान , भाषा इ. तर आहेच पण सर्वात महत्वाचा म्हणजे सांस्कृतिक फरक. ह्यात देखील पेहराव किंवा फ़क़्त दिखावू गोष्टींपलीकडे जाऊन विचार केला तर असं प्रश्न पडतो की हे असे का ?
उदाहरणार्थ : पश्चिमेकडील अमेरिका आणि पूर्वेकडील भारत घेऊ. त्यातही मुख्यत्वे ख्रिस्चन आणि हिंदू विचारसरणी ह्या संबंधी विचार करू.
अमेरिकेत जेवणाची पद्धत म्हणजे प्रथम starters मग maincourse मग dessert . त्यातपण शेफने जे बनवल असेल ते जवळ जवळ तसंच खावं लागता काही फार बदल न करता. फार फार तर तुम्ही वरून, मीठ, चीज किंवा pepper घेऊ शकता. पण standardization कडे कल असतो. जेवणाच्या सुरवातीलाच dessert कोणी खात नाही. हीच खायची योग्य पद्धत आहे असे लहानपणापासून बिंबवले जाते किंवा असेच जेवण जेवले पाहिजे. (This is the right way to satisfy your hunger)
उलट भारतीय थाळी घ्या. प्रथम गोड खा किंवा तिखट खा किंवा कोशिंबीर (सलाड ) खा किंवा इतर काही. तुमची मर्जी. रोटी भाजी बरोबर खा, दाल बरोबर खा , तीच दाल भाताबरोबर खा. हवं ते combination करा तुम्हाला आवडेल असं. मग एखादा भातात थोडी भाजी , थोडी दाल घेऊन खाईन तर दुसरा फ़क़्त भात आणी दाल खाईल, तिसरा आणखी कुठल्या पद्धतीने. बर आणी तीच चव पुन्हा येईल असं नाही. कारण कुठली गोष्ट किती प्रमाणात मिसळली आहे हे प्रत्येक जण आप आपल्या चवीनुसार ठरवतो. standardization नाही, तुम्हाला हव तसं , आवडेल तसं खा. इथे काय पदार्थ खाल्ले जातात हा मुद्दा नसून खाण्याची पद्धत हा मुद्दा आहे. (There is no right or wrong way, you decide your own way to satisfy your hunger)
आणखी एक उदाहरण , आपण पुस्तकांना पाय लागला तर नमस्कार करून क्षमा मागतो पण अमेरिकेत असं काही नाही. इथे कोण बरोबर कोण चूक हा मुद्दा नसून हे असं का हा मुद्दा आहे.
शाकाहार आणि मांसाहार हा तर अनादी काळापासून चर्चेचा मुद्दा आहे. सध्या जवळ जवळ सगळेच सर्व प्रकारचे पदार्थ खातात पण भारतात अजूनही मुक्या प्राण्यांना मारून खाणे बरोबर नाही असा मतप्रवाह आहे पण अमेरिकेत असं काही नाही. हवामान आणि अन्नाची उपलब्धतता हा वेगळा मुद्दा पण प्राण्यांना मारण्यावरून हा विचारांमधील फरक का ?
पाश्चात्य देशातील कोणतीही कंपनी घ्या. Company vision > Mission > Goals > Objectives अशी संगती दिसेल. Company vision म्हणजे promised land जिथे जाण्यासाठीचे अमुक अमुक नियम. हे नियम पाळा म्हणजे तुम्ही तिथे पोहोचाल. ह्याउलट आपल्याकडे असं काही का काही नव्हतं ?
तर हे असं का ह्याचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते कि एका विचारधारेतून एक तत्व जन्माला येते . माणसाचा ह्या तत्वावर विश्वास असतो आणि त्या विश्वासामुळे तो ठराविक पद्धतीचे आचरण करतो. Philosophy leads to beliefs and Belief leads to behavior . हा विश्वास हा माणसाची जडण घडण कशी झाली आहे ह्यावर अवलंबून असतो. ह्या जडण घडणीमध्ये लहानपणीचे संस्कार, अनुभव , वाचन , आजूबाजूची माणसे व त्यांचे विचार ह्यांचा वाटा असतो. वरील सर्व उदाहरणांमध्ये आचरणातील फरक दिसून येतो याचा अर्थ आपल्या आणी इतर लोकांच्या विश्वासात फरक आहे. म्हणजेच आपण जी तत्वे मानतो ती पाश्चिमात्य लोक जी तत्वे मानतात त्यापेक्ष्या वेगळी आहेत. तत्वे वेगळी आहेत कारण ज्या मूळ विचारधारातून ह्या तत्वांचा उगम झाला आहे त्या विचारधाराच भिन्न आहेत . आणी त्या 2 भिन्न विचारधारा म्हणजेच concept of monality vs duality !
Monality म्हणजे मी आणि ईश्वर एकचं आहे. अहम ब्रम्हास्मि. तुझ्यातही देव आहे आणी माझ्यातही आहे. तसाच तो इतर सर्वत्र आहे. प्राणी, झाडे इ. सजीव ह्याचबरोबर वह्या पुस्तके ह्यांना देखील देवाचे (सरस्वतीचे ) रूप मानले आहे. ह्याच बरोबर जन्म मृत्यूचे चक्र असून ह्यातून मुक्ती मिळवणे हेच अंतिम ध्येय आहे अशी विचारधारा आहे. याचाच अर्थ स्वर्ग आणी नर्क येथे तुम्ही काही काळापुरते राहता आणि पुन्हा जन्म मृत्युच्या चक्रात अडकता मोक्ष मिळेपर्यंत.
Duality म्हणजे देव (God )आहे ज्याने त्याचा दूत (Son of God) मनुष्यरुपात पृथ्वीवर पाठवला (Jesus) आणि त्याने नियम घालून दिले जे पाळल्याने आपण स्वर्गात (promised land) कडे जाऊ. म्हणजेच देव आणी त्याचा मनुष्यरुपात असलेला दूत ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. देवाने मनुष्याला विशेष क्षमता दिल्या आहेत, म्हणून तो इतर प्राण्यांच्यापेक्ष्या वरच्या स्तरात (superior) आहे . त्यामुळे आपल्याला मिळालेल्या किंवा देवाने दिलेल्या क्षमता वापरून जर आपण काही केले तर ते चालते हा समज आहे. त्याच बरोबर हा एकचं जन्म असून शेवटी आपण मिळवलेल्या गोष्टींवरून (sum of achievements) आपल्याला स्वर्ग (place of hero's)किंवा नर्क येथे कायमचे स्थान मिळते.
Duality नुसार जन्म हा एकचं आहे त्यामुळे जे काही करायचे ते परफेक्टच. 10 commandments नुसार तुम्ही हे नियम पाळा म्हणजे तुम्हाला स्वर्गात (promised land) कडे जाता येईल असे सांगितले आहे. म्हणजेच प्रत्येक गोष्ट बरोबर किंवा चूक, योग्य किंवा अयोग्य अश्या मध्ये वर्गीकरणाची वृत्ती दिसते. ह्या उलट Monality मध्ये देव तुझ्यातच आहे त्याचा शोध तुला स्वतःलाच घ्यायचा आहे असे सांगितले आहे. आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत अनेक जन्म घ्यावे लागतील. म्हणजेच आपण स्वतच ठरवायचे कि आपण कोणता मार्ग निवडायचा. ज्याने असं आवडेल तसा निवडावा. कोणी जंगलात जाऊन साधना करा , कोणी देवळात जाऊन करा, कोणी सर्वांबरोबर एकत्र प्रार्थना करा, कोणी घरच्या घरी करा. एक फॉर्म्युला नाही ज्याला जस आवडेल तस करा. शेवटी ध्येय एकचं. अश्या प्रकारे विचारधारेतून तत्व किंवा विश्वास तयार होतो. आणि त्यावरून माणूस स्वतःची वर्तणूक ठरवतो.
एकदा आपण हे सर्व समजून घेतलं की आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होतो. आत्ता पुन्हा वरील उदाहरणे पाहू.
१. जेवायचा हीच योग्य पद्धत आहे ज्यामुळे तुम्हाला जेवल्याचे समाधान मिळेल आणि याउलट तुम्हाला हव तसा जेवा, आवडेल तसे जेवा कारण तुमचा समाधान हे तुम्हीच शोधून काढायचा आहे तुम्हाला आवडेल त्या मार्गाने. इथे कोणताही एकचं योग्य मार्ग नाही.
२. पुस्तक म्हणजे सरस्वतीचे रूप. त्याला पाय लागला तर क्षमा ही मागितलीच पाहिजे. हाच भाव आपण जमिनीला पाय लावतो म्हणून जमिनीची किंवा पृथ्वीची क्षमा मागून दिवसाची सुरवात अनेकजण करतात. या उलट मनुष्याला देवाने बुद्धी दिली आहे आणी त्याचा वापर करून त्याने बाकीच्या गोष्टी निर्माण केल्या त्यामुळे त्या गोष्टींपेक्षा माणूस श्रेष्ठ आहे. ज्ञान हे माणसाच्या डोक्यात आहे पुस्तक हे फ़क़्त माध्यम आहे माणसानेच निर्माण केलेलं.
३. देव माझ्यात आहे तसाच प्राण्यातही आहे. त्यामुळे प्राणी मारणे योग्य नाही याउलट देवाचा दूत हा माणूस होता म्हणजे माणूस हा देवाला इतर प्रजातीन्पेक्ष्या प्रिय असून त्यामुळे तो इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि जगातील इतर गोष्टी ह्या माणसाच्या उपभोगासाठीच आहेत. त्यामुळे इतर प्राण्यांना खाणे यात गैर काहीच नाही. ह्यात कोण चूक कोण बरोबर हा मुद्दा नसून हे असं का हा आहे .
४. जन्म एकाच आहे त्यामुळे सर्व काही ताबडतोब झाले पाहिजे, ह्याच पद्धतीने झाले पाहिजे. त्यामुळे पूर्वीपासून तुम्ही ह्या जन्मात काहीतरी heroic असा केला पाहिजे तरच शेवटी तुम्हाला Elysium मध्ये म्हणजे अशी जागा जिथे देव सगळ्या hero किंवा ज्याने आयुष्यात काही तरी करून दाखवलंय अश्यांना स्थान देतो. या उलट आपल्याकडे एक नसून अनेक जन्म घ्यावे लागतात अशी विचारधारा आहे. त्यामुळे कमावलेले सगळे इथेच सोडून जायचे आहे , सोबत येतील ती फ़क़्त आपली कर्मे, त्यामुळे ह्या चक्रातून मुक्त व्हायचे असेल तर चांगली कर्मे करा. अनाठायी खर्च करू नये, कारण आपला जन्म कदाचित पुन्हा ह्याच घरात होऊ शकेल .
देवदत्त पटनाईक ह्यांनी ह्या बाबतीत एक छान किस्सा सांगितला होता. जेव्हा सिकंदर भारतावर स्वारी करणार होता त्या आधी त्याचा डेरा भारताच्या सीमेवर होता . सिकंदरला अनेक विजय तोपर्यंत मिळाले होते आणि त्याची इच्छया जग काबीज करायची होती. असाच तो एकदा रात्रीच्या वेळी आपल्या घोड्यावरून फेरफटका मारत असताना त्याला एक उघडा नागडा माणूस तळ्याकाठी आकाशाकडे बघत असलेला दिसला. त्याने त्या माणसाला विचारले कि तू काय करतोय ? तेव्हा त्या माणसाने उलट सिकंदरला विचारलं , तू काय करतोय ? तेव्हा सिकंदर म्हणाला मी इथे जग काबीज करतोय. तू काय करतोय ? तर तो माणूस म्हणाला मी स्वतःला काबीज करण्याचा प्रयत्न करतोय . आणी एवढे बोलून दोघेही हसायला लागले . हसण्याचं कारण ? पहिल्याला वाटला दुसरा मूर्ख आहे आणी दुसर्याला वाटला पहिला मूर्ख आहे. इथे मूर्ख खरतर कोणीच नाही. हा दोन विचार्धारामधील फरक त्यांच्या वर्तणुकीतून जाणवत होता. सिकंदरला वाटल, हा काय वेळ वाया घालवत बसलाय काहीही न करता ? ह्याचा जन्म हा फुकट घालवणार आणि त्या माणसाने विचार केला , जग जिंकून काय करणार? सगळ सोडून जायचं एक दिवस आणि स्वतःचा शोध नाही घेतला तर परत ह्या जन्म मृत्युच्या चक्रात फिरायचं, जग जिंकण्यात हा ह्याचा जन्म वाया घालवत आहे.
आता आपल्याला कळू शकेल की पाश्चात्य orchestra ला नोट्स आणी conductor का असतो (right way, follow the rule) आणि भारतीय संगीतात conductor नसतो . कलाकार त्याला रुचेल अश्या पद्धतीने वाजवतो (follow your own way) आणी त्यामुळेच पाश्चात्य संगीतातला performance ची पुनरावृत्ती होऊ शकते पण एखाद्या गायकाने अगर तबलजीने एखादी तान किंवा तुकडा हा एकमेवाद्वितीय असतो. त्या कलाकाराला देखील तसाच performance परत देत येइलच ह्याची १००% हमी नाही.
अमेरिकेतही पूर्वी शेतीसाठी बैल वापरले जायचे आणि भारतात तर आजही वापरले जातात पण बैल पोळा आपल्याकडेच का ?
पाश्चात्य उत्तर हो किंवा नाही , बरोबर किंवा चूक आणि आपल्याकडे असू शकेल (may be) व त्यातून उगम पावलेलं famous indian head shake ... पाश्चात्य लोक ह्यामुळे गोंधळतात ते का, ते आपल्याला आता कळेल आणि भारतीय लोक मुद्दाम असं करत नाहीत, ते नकळत होत, ते का हे सुद्धा आता लक्ष्यात येईल.
कोणी म्हणेल हे सगळं जाणून घेऊन मला काय करायचं ? मला काय उपयोग ह्या असल्या गोष्टींचा ?
उपयोग आहे, नक्की आहे. जेव्हा तुम्ही ह्या दोन विचारधारा समजून घ्याल तेव्हा तुम्हाला कळू लागत कि समोरचा माणूस एका विशिष्ठ प्रकारे का वागत आहे ? आणी हे जाणून घेतल्याने आपण स्वतःच्यात आणी दुसर्या व्यक्तीतील फरकाचा आदर करू लागतो . माझे बरोबर तुझे चूक किंवा आपला मुद्दा ठासून सांगायची वृत्ती संपते कारण तुम्हाला लक्षात येत की कोणीतरी बरोबर किंवा चूक नाहीये. तर दोन वेगळ्या विचारधारांना मानणारे हे लोक असून दोघेही आपापल्या परीने बरोबर आहेत. हे जेव्हा आपल्या लक्षात येत तेव्हा जगण्यातली खरी गंमत कळू लागते.
टीप : ह्या लेखातील काही विचार देवदत्त पटनायक ह्यांच्या कर्तायात्रा ह्यावरून प्रेरित आहेत.

भारतीय प्रसारमाध्यमे आणी विश्वासार्हता

लेखाच्या सुरवातीलाच नमूद करू इच्छितो की हे माझे वैयक्तीक विचार असून लेखाच्या शेवटी घेतलेला निर्णय हा मी माझ्यापुरता घेतलेला आहे.
९० च्या दशकापर्यंत बातम्या मिळवण्यासाठी दूरदर्शन/आकाशवाणी हे एकमेव साधन होते. संध्याकाळी ७ च्या मराठी बातम्या माझे वडील न चुकता पहायचे आणी अजूनही पाहतात. त्या बातम्यांना एक दर्जा होता आणी मुख्य म्हणजे कुठलीही सनसनी निर्माण करणे हा उद्देश नसायचा. पण आज काय स्थिती आहे ? २४ तास दळण दळल्यासारख्या News चानेल्स सुरु आहेत. दर्जाच्या नावानी तर बोम्ब ! कित्येकवेळा १ ओळीची बातमी आणी २० सेकंदांचे फुटेज परत परत परत परत एकदा active voice एकदा passive voice मध्ये सांगून आणी फुटेज repeat मोड वर लावून अर्ध्या तासाचा exclusive प्रोग्राम करतात. उदाहरण : "हे बघा ते येत आहेत " …… परत थोड्या वेळानी " हे पहा ते आपल्याला येताना दिसत आहेत " …… परत थोड्या वेळानी … " फ़क़्त आमच्या channel वरतीच यांना येताना दाखवण्यात येत आहे" …. अरे काय लावलंय ? काही तरी दर्जा ?
पण लेखाचा उद्देश हा नाही, मुद्दा हा आहे की पत्रकारांच काम पूर्ण आणी खऱ्या बातम्या देणे हे आहे. पण आज तसे दिसतं नाही. आपण काही उदाहरणे पाहुयात :
१. १६ एप्रिल २०१५ : कॅनडाने भारतीयांना वीसा ओन arrival ची घोषणा केली
video नीट पाहिला तर इंग्लिश येणाऱ्या कोणालाही कळेल की कॅनडाच्या लोकांसाठी भारताचा हा वीसा ओन arrival प्रोग्राम आहे. Times of India आणी कित्येक अनेक माध्यमांनी ही चुकीची बातमी exclusive च्या नावाखाली रिपोर्ट केली. ह्यामुळे पुढे काही वेगळे पेच निर्माण झाले तर मेडिया जबाबदारी घेणार का ?
२. मुस्लिम तरुणीला मुंबईत घर नाकारले : पोलिसांनी पूर्ण तपास केल्यावर ह्या बातमीत कोणतेही तथ्य आढळले नाही. त्या इमारतीत अनेक मुस्लिम राहत होते .
ह्या बातमीमुळे जर समाजात तेढ निर्माण झाली आणी त्यातून काही दंगे आणी नुकसान झाल तर त्याला कोण जबाबदार ?
३. जसलीन कौर प्रकरण : The “Pervert” who “molested” Jasleen Kaur अश्या मथळ्याखाली बातम्या प्रसिध्द झाल्या. सत्य काय आहे हे न तपासता एखाद्याला गुन्हेगार म्हणून घोषित करून तसा अख्या जगाला सांगायचं. अनेक प्रत्यक्ष दर्शी लोकांनुसार असे काहीही घडले नाही. न्यायदान केल्यासारख त्या बातमीवर निकाल देणे हे news channels चं काम नाही त्यासाठी न्यायालये आहेत. इथे त्या मुलाने बदनामीला कंटाळून स्वतःचं काही बर वाईट करून घेतलं तर एका मुलाचा आयुष्य हकनाक उध्वस्त केल्याची media जबाबदारी घेणार का ?
४. section १२४ अ : Breaking Now: Maharashtra govt issues draconian diktat. 'Sedition charges for criticising state, central govt.'
पण खरी गोष्ट अशी नाहीच आहे. ज्यांना हवा असेल तर महाराष्ट्र सरकारचे मूळ पत्रक इथे वाचू शकतात :
ह्यात स्पष्ट लिहिले आहे की ज्यामुळे समाजात हिंसा , द्वेष पसरेल असे वाटेल तेव्हाच हे कलम लावण्यात यावे. ह्यात काय चुकीचे आहे ? media नि कसही बेताल reporting करायचं , वाट्टेल त्या बातम्या खर्याची शहानिशा न करता द्यायच्या आणी ह्यामुळे हिंसा आणी द्वेष पसरला तर कारवाई झाल्यास आमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य बुडाले म्हणून गळे काढायचे ? म्हणजे ह्यांना अधिकार मात्र हवा पण त्याबरोबर येणारी जबाबदारी मात्र नको. ह्या चुकीच्या बातम्या दिल्याबद्दल एका तरी चानेल ने दिलगिरी व्यक्त केलीये का ? एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी चव्हाट्यावर आणून त्या जगाला दाखवायच्या, तेव्हा आपण एखाद्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करतो हे कळत नाही आणी अश्या बेताल वागणुकीसाठी सरकारने नियम केला की लगेच कोल्हेकुई सुरु.
५. अजित डोवल हे पंतप्रधानाच्या एका दौर्यातील convoy मध्ये होते. ते दौरा सोडून अचानक भारतात परत आले. आपल्या माध्यमातील सो called expert लोकांची लगेच बडबड सुरु झाली . हे आंतरराष्ट्रीय संकेताच्या विरुध्द आहे, हा त्या दुसर्या देशाच्या सरकारचा अपमान आहे ,पंतप्रधानांनी अशी परवानगी दिलीच कशी ? फलाना ठिकाणा … दिवसभर तेच दळण दळत बसले होते , थोड्या दिवसांनी भारतीय सैन्यांनी operation म्यानमार केलं जिथे म्यानमारमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खातमा करण्यात आला आणी operation planning मध्ये मुख्य होते अजित डोवल ! आपण ह्या माणसाबद्दल काही दिवसांपूर्वीच किती वीष पसरवत होतो हे विसरून भारतीय सैन्याचं गुणगान सुरू , गुणगान अवश्य करा पण आपण आधी जी घाण केली ती साफ कोण करणार ?
६. अनुराग कश्यपनी टाकलेल्या tweat वर कोणतीही शहानिशा न करता भारतीय माध्यमांनी इतक्या कहाण्या report केल्या आणी शेवटी कळलं की अनुराग कश्यप नी डोळ्यांसाठी prosthetics test केली आणी त्याचा तो फोटो होता. इतकी चुकीची बातमी दिवसभर मीठ लावून सांगितल्याबद्दल एकही माध्यमांनी दिलगिरी व्यक्त केली नाही
भारतीय प्रसारमाध्यमांच्या double standard चा खरोखर वीट आलाय आणी माझ्या लेखी तरी ही सर्व भारतीय माध्यम त्यांची विश्वासार्हता गमावून बसले आहेत. काही माध्यमे चांगली असतील ही पण ओल्या बरोबर सुक जळले तसा हा काहीसा भाग आहे . आणी त्यामुळे मी माझ्या पुरता असा निर्णय घेतलाय की भारतीय माध्यमातील कोणतीही बातमी ही विदेशी माध्यमातील बातमीबरोबर जुळत असल्यासच त्या बातमीवर विश्वास ठेवायचा. आणी पूर्वी होतं तसं फ़क़्त दूरदर्शनच्याच संध्याकाळच्या बातम्या बघायच्या. आवश्यक ती बातमी आवश्यक त्या प्रमाणात कळते आणी तेही अर्ध्या तासात !

अमेरिकेतील काही भारतीयांचे अनुभव

इथे मी अमेरिकेतील वेगवेगळ्या ठिकाणी आलेले भारतीय लोकांचे अनुभव मांडत आहे :
---------------------------------------------------------------
१.
एकदा मित्राला आणायला न्यूयॉर्क विमानतळावर गेलो होतो. मित्राला रेसिव करून taxi stand वर आलो आणि एका taxi मध्ये बसलो. योगायोगानी taxi driver पंजाबी होता. त्याच्याशी हिंदी मधून गप्पा मारायला सुरवात केली. सुमारे तासाभरानी आम्ही पोहोचलो. मित्राचे घर तिसर्‍या मजल्यावर आहे (लिफ्ट नाही). आम्ही उतरल्यावर त्या सरदार driver ने स्वतःहुन bags वर आणून दिल्या. त्या बद्दल त्याला जास्तीचे पैसे देवू केले तर ते त्यानी नाकारले आणि म्हणाला "ओये अपणे भाई के वास्ते किया यार" आणि आपले कार्ड देवून निघून गेला.
२.
मी व बायको एकदा एका indian store मध्ये गेलो जे फ़क़्त पूजा सामानासाठी प्रसिद्ध आहे. त्या दुकानाचा मालक गुजराती. तिथे जवळ जवळ सर्व पूजा सामान मिळाले फ़क़्त गेजावस्त्र सोडून. आम्ही त्याला त्या बद्दल विचारलं तर त्याला गेजा वस्त्र म्हणजे काय ते माहित नव्हतं. आम्ही थोडं वर्णन केल्यावर त्यांनी लगेच त्याची डायरी काढली आणि त्यात गेजा वस्त्र अशी नोंद केली. स्वतच्या फोन वर लगेच गूगल करून ही काय वस्तू आहे ते पाहिलं आणि लगेच स्वतःचं कार्ड देऊन म्हणाला "१५ दिन के बाद फोन करो अगर उसे पहिले आता हे तो मै आपको बता दुंगा, आप अपना नंबर दो ".
३.
एका दुकानात गेलो होतो जे खास महाराष्ट्रीयन वस्तुंसाठी प्रसिद्ध आहे. तिथे भाजणीचे पीठ, मेतकूट, कांदा लसूण ठेचा आणि बर्‍याच इतर महाराष्ट्रीयन वस्तू मिळतात. त्याचा मालक महाराष्ट्रीयन आहे. पण तिथे त्याला जे विचारू त्याचं १ किंवा २ शब्दात उत्तर आणि तेही चेहर्‍यावरची रेषही न हलू देता. जसा काही एखादा रोबो बोलत आहे. तो मराठी आहे म्हणून त्याच्याशी मराठीत बोललो तर उत्तर इंग्लिश मधून. मग मी इंग्लिश मधून बोललो तरी तेच … बहुतेक ह्याला शाळेत असताना एका शब्दात उत्तरे द्या हा खूप भाग आवडता होता की काय असं वाटून गेलं.
उदा: तुमच्याकडे भाजणीच्या चकल्या आहेत का ? उत्तर :- by order only.
I need to place the order. उत्तर:- उत्तर म्हणून त्याने त्याचे कार्ड दिले ज्यावर लिहिले होते to order send email toxxxxx@xxx.com आणी त्या इमेल वर बोट ठेवून ते tap केल. तोंडातून काहीही उत्तर नाही.
--------------------------------------------------------
तीन माणसे, तीनही भारतीय पण गिऱ्हाइकाशी वागायची पद्धत ही त्यांच्या मानसिकतेबद्दल बरच सांगून जाते. पहिल्या दोघांना माझाकडून repeat business आणि तिसर्‍याला bad mouth publicity मिळाली ह्यात आश्चर्य ते काय ?

पुराणातील वांगी ?

आपल्याकडील काही लोक हे आपल्या पूर्वजांनी काय केले याचेच कौतुक करण्यात मग्न असतात . आपल्या पूर्वजांनी केले असेल भले, पण त्याचा आपण काहीही उपयोग करून न घेता किंवा त्यात काही भर न टाकता नुसतेच बडबड करत बसण्यात काय अर्थ आहे ? मला अशा लोकांचं खरच आश्चर्य वाटत. दुसर्यांनी केलेली प्रगती किंवा शोध याचे कौतुक करून आपल्या भारतात हे का नाही करू शकलो ह्याचा विचार करण्याऐवजी "काय त्यात एवढं , हे तर भारतात १००० वर्षांपूर्वीच होत" अस म्हणण्यात कसला अभिमान ?
आपण काही उदाहरणे बघू ज्यात अ म्हणजे एखादा शोध किंवा तंत्रज्ञान आणि ब म्हणजे वरील प्रकारच्या लोकांकडून आलेल्या प्रतिक्रिया व माझी प्रतिक्रिया :
अ : अणूबॉम्बचा शोध
ब : हें , आपल्याकडे आग्नेयास्त्र होत पूर्वी. महाभारतात वापर केला होता. कुरुक्षेत्रावर अजून काहीही उगवत नाही !!!
मी : असू शकेल , पण आपण त्या तंत्रज्ञानाचा आजच्या वापरासाठी काय उपयोग केला ? आजही आपण अनेक शस्त्रास्त्रे रशियासारख्या देशाकडून आयात करतो आणि करोडो रुपये यावर दर वर्षी खर्च होतात . भारताच्या अणूविषयक कार्यक्रमासाठी युरेनियम बाहेरून आयात करतो , reactors आयात करतो. मग आपल्याकडील ह्या पूर्वजांकडील ज्ञानाचा नुसताच बढाई मारून काय फायदा ?
अ : विमान
ब: आपल्याकडे विमानाचा शोध प्रथम लागला , अमेरिकेत नाही . रामायणापासून उल्लेख आहे विमान वापरल्याचा . vimanas नावाची एक documentary पण आहे त्यावर.
मी : ठीक आहे , पण आज आपल्या भारताची काय स्थिती आहे ? करोडो रुपये खर्चून आपण आज फ्रांसकडून विमाने विकत घेत आहोत. विमानाची technology जर आपल्याकडे आधीपासून होती तर पण आपण आज त्याचा आपल्या देशासाठी काय उपयोग करून घेतला ?
अ : प्रोग्रामिंग
ब : आपली संस्कृत प्रोग्रामिंगसाठी बेस्ट आहे असे नवीन संशोधन झाले आहे. आपल्याकडे हे आधीपासूनच आहे, हे C /C ++ वगैरे आत्ताच आहे.
मी : आपण जे बोललात त्यातच सगळ आलं. संस्कृत हि आपली भाषा , ती प्रोग्रामिंगसाठी चांगली हे आपल्याला पाश्च्यात्त देशातील लोकांनी सांगितल्यावर आपल्याला कळते ? संस्कृत प्रोग्रामिंगसाठी वापरता येईल कि नाही तो भाग वेगळा , पण तिकडचे लोक आपल्या संस्कृतवर संशोधन करून जगाला सांगतात आणि आपण फ़क़्त हो हो बघा आम्ही किती भारी , आमची संस्कृत किती भारी असे म्हणत बसण्यातच धन्यता मानतो. मग तिकडचाच कोणीतरी त्यावर अधिक संशोधन करतो आणि patent मिळवून ते तंत्रज्ञान आम्हालाच विकतो.
अ: शस्त्रक्रिया / एखादं नवीन मशीन किंवा तंत्र
ब : आपल्या भारतात सुश्रुताने हजारो वर्षांपूर्वी अमुक तमुक इतकी अवघड शस्त्रक्रिया केली होती. आपल्या भारतात हि गोष्ट तेव्हापासूनच माहीत होती . हे इतक्या वर्षांनी शोधून काढलं या पाश्च्यात्त लोकांनी .
मी : आपल्याला माहित होतं ना आधीपासून पण सध्या आपण त्याचा काय फायदा करून घेतोय ? आज भारत अनेक औषधे , मशिन्स , medical parts परदेशातून आयात करतो . operation करण्यासाठी डॉक्टरनी भारतीय part X रुपयांना आणी परदेशी पार्ट ८X रुपयांना असे सांगितल्यावर कितीतरी जण महाग असूनही परदेशी पार्ट वापरा असं सांगतात. कदाचित भारतीय पार्ट चांगला असेलही , पण quality बाबतीत तो विश्वास वाटत नाही. याची कारणे अनेक असू शकतील जसे कि परदेशी कंपन्यांचे aggressive मार्केटिंग वेगैरे पण शेवटी भारतातील पैसा बाहेर जातो आहे हे सत्य राहतेच. मग सुश्रुताने हजारो वर्षांपूर्वी अमुक तमुक इतकी अवघड शस्त्रक्रिया केली होती याचा आपल्याला सध्या काय उपयोग झाला ?
मला भारताला किंवा आपल्याकडील प्रत्येक गोष्टींना नावं ठेवायची नाहीत. परवाची इस्रोची कामगिरी बघून खूप अभिमान वाटला. किती तरी अमेरिकन मित्रांना हे माझ्या भारतातील संशोधकांनी करून दाखवलं अस मी अभिमानाने सांगितलं. मोदींचा "स्वच्छ गंगा " प्रोजेक्ट , पूर्वीपासून आपण नद्यांना पूजनीय मानत आलो आहोत आणी आता तिच्या सफाईसाठी प्रयत्न करतो आहोत ही खूप चांगली गोष्ट आहे. आपल्याकडे अगदी सम्राट अशोकाच्या काळापासून चर खणणे, बांध घालून पाणी जिरवणे ह्या गोष्टी केल्या जायच्या, सध्या महाराष्ट्रात राबवली गेलेली "जलयुक्त शिवार योजना " आणी त्यामुळे वर्धा आणी नागपूर येथे मुबलक उपलब्ध झालेले पाणी हे चर खणणे, बांध घालून पाणी जिरवणे ह्यामुळेच शक्य झाले.
आपल्याकडे असलेले पुराणातील ज्ञान आपण वापरून आज आपला उत्कर्ष कसा होईल हे पाहीले तर त्या ज्ञानाचा सदुपयोग झाला असे म्हणता येईल . दुसर्यांनी केलेल्या कष्टांमूळे लागलेले शोधांच क्रेडीट ज्याचं त्याला देऊन आपल्याला काय करता येईल ह्याचा विचार न करता नुसतेच आमचे पूर्वज असे होते आणी आपल्याकडे अमुक तमुक आधी पासूनच होते असं म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात काय अर्थ आहे ?

अमेरिकेतील हॉटेलचा अनुभव

मी न्यूयोर्कमध्ये पोहोचल्यावर मित्राकडे आलो. तो त्याच्या roommates बरोबर राहायचा पण त्याचा roommate समर vacation साठी भारतात गेला होता आणी त्याच्या जागी माझी राहायची सोय झाली. मित्राच्या घरी पोहोचल्यावर गप्पा वगैरे झाल्या. मित्राला दुसर्या दिवशी सकाळी त्याच्या universityमध्ये on -campus जॉबसाठी जायच असल्याने त्याने रात्रीच त्याच्याकडची घराची चावी मला दिली. जवळ जवळ २३ तासाचा सलग प्रवास झाला होता त्यामुळे मी खूप दमलो होतो आणि काहीही न खाता सरळ झोपून टाकलं.
दुसर्या दिवशी थेट सकाळी ११:३० वाजता जाग आली. पोटात भुकेने कावळे ओरडत होते. फ्रेश होऊन काहीतरी खायला म्हणून घराबाहेर पडलो. न्यूयोर्कमध्ये १-२ block चाललं कि अनेक हॉटेल्स दिसतात. माझी ही अमेरिकेत पहिलीच वेळ, त्यातून मी veg खाणारा. चालता चालता बरीच हॉटेल्स लागत होती पण आपल्याला कोणते चालेल हे काही नक्की कळत नव्हतं. न्यूयोर्कमध्ये summer सुरु होता. त्या रणरणत्या उन्हात चालून खूप तहान लागली होती. १५-२० मिनीट चालल्यावर शेवटी एके ठिकाणी veg falafel असा बोर्ड पाहीला आणी जवळ गेलो तर छान खमंग वास आला आणि मी सरळ त्या हॉटेल मध्ये घुसलो.
हॉटेल तस लहानच होतं, फ़क़्त ६-७ टेबल्स होती. तिथे एका टेबलवर जाऊन बसलो. माझ्या टेबलवर अर्धा लिटरची पाण्याची बाटली आधीपासूनच ठेवली होती. भारतात हॉटेलमध्ये गेलं की विचारतात साध पाणी की बिसलेरी? मला वाटला अमेरिकेत ही अशी पद्धत असेल की प्रत्येकाला बिसलेरीचच पाणी by default ! . मी ती सीलबंद बाटली उघडून घटाघटा पाणी प्यायलो. जवळ जवळ निम्मी बाटली संपवली. मग थोडं निवांत होऊन इकडे तिकडे पाहू लागलो तो बोर्ड दिसला - सेल्फ सर्विस ! मग मी उठून आतल्या बाजूच्या counter वर गेलो, ऑर्डर दिली. एवढ्यात प्यायलेल्या पाण्याने कामगिरी चोख बजावली आणी मी counter वरच्या माणसाला रेस्टरूम कुठे आहे ते विचारल. त्याने त्या दिशेला बोट दाखवलं आणि मी एका अंधार्या कोपऱ्यापाशी आलो. तिथे रेस्टरूमच्या दिव्याचे बटन होते ते मी खाली केले (लाईट सुरु होण्यासाठी ) आणी दरवाजा उघडायचा प्रयत्न केला पण कोणीतरी आत होतं म्हणून मी तिथेच बाहेर वाट बघत थांबलो. थोड्या वेळात एक माणूस बाहेर आला आणि मला म्हटला " Did you turn the lights off when I was taking my dump?" च्यायला झाला का घोळ …. अमेरिकेत बटन वर म्हणजे लाईट चालू आणी खाली म्हणजे बंद ह्याचा आत्ता मला खुलासा झाला. lessons learned …. भारतात ह्याच्याबरोबर विरुद्ध आहे त्यामुळे माझा हा घोळ झाला. मी त्या माणसाला sorry म्हणून पटकन आत घुसलो. साधारण मिनिटभराने बाहेर आलो तेव्हा तोच माणूस मी ज्या टेबलवर बसलो होतो तिथे उभा राहून मोठ्या मोठ्याने ओरडत होता. "Who the hell drank my water ?" म्हणजे ती पाण्याची बाटली त्याची होती !!!! मग माझे बाकीच्या टेबलकडे लक्ष गेलं आणी माझ्या लक्षात आलं की बाकीच्या कोणत्याही टेबलवर बाटली नाहीये. याचाच अर्थ अमेरिकेत अशी by default बिसलेरी वगैरे द्यायची काही पद्धत नाहीये .. lessons learned again …… मला अगदी शरमल्यासारखे झाले, मी त्या माणसाकडे जाऊन पुन्हा त्याला sorry म्हटलं आणी सांगितलं की मी ते पाणी प्यायलो आणी मी त्याचे तुम्हाला पैसे देतो. तो माणूस अतिशय वैतागून मला म्हटला " why are you after me man ? Why ? " असं म्हणत तरातरा तिथून निघून गेला. इतक्यात counter वरील माणसाने order तयार आहे असं सांगितलं पण आता इतका तमाशा तिथे झाल्यावर मला आता तिथे थांबण्याची बिलकुल इच्छया होत नव्हती. मी ते पार्सल घेऊन घरी यायला निघालो आणि मनात विचार आला …. " अमेरिकेत तुझ स्वागत आहे मित्रा …. आपण कितीही शिकलेले असू पण वेगळा देश, निराळी संस्कृती आपल्याला किती काही शिकवून जातात नाही ? "

USA it is ...

हा माझा अनुभव २०१० मधील आहे.
१५ जुलै २०१० ला माझा F१ वीसा मंजूर झाला आणि एकच घाई उडाली. संन्याश्याच्या लग्नाला शेंडीपासून तयारी असं म्हणतात ते काही खोटं नाही. माझ्या बाबतीत संन्याश्याचं लग्न जरी नसलं तरी तयारी मात्र खूप करावी लागली. खरेदी, डॉक्टर, औषध, पैश्याची व्यवस्था, तुटपुंजा का होईना पण स्वतः पुरता स्वयंपाक शिकणे, बॅग भरणे, वजनात ती बसवणे इत्यादी गोष्टी करून झाल्यावर शेवटी एकदाचा १९ ऑगस्ट उजाडला. आई बाबांचा एअरपोर्ट वर निरोप घेउन मी आत गेलो. आत गेल्यावर पहिली चिंता म्हणजे बॅग्ज वजनात बसतील की नाही? घरी वजन केले होते पण तरीही धाकधूक होतीच. नाही बसल्या तर काय करायचं ह्याचा प्लान चालू होता पण ती वेळ आली नाही, माझ्या बॅग्ज कार्गो लगेज मधून USA साठी रवाना झाल्या. आता ह्यांच दर्शन USA मध्येच ! तेवढ्यात Columbia University ला जाणारे माझे मित्र भेटले, मग काय निवांत गप्पा चालू झाल्या. केबिन बॅगेजचं सिक्यूरिटी चेक पास करून आम्ही वेटिंग एरिया मध्ये आलो. तिथे थोड खाउन घेतलं तेव्हड्यात आमच्या विमानाची घोषणा झाली. विमानामध्ये बसलो.
परदेशात जाण्यासाठी विमान प्रवासाची ही माझी पहिलीच वेळ! विमानाची वेळ रात्री १ वाजताची होती. १ वाजता विमानाने टेक-ऑफ करायला हवे होते पण काय झाल काय माहित? तशी काही चिन्ह दिसेनात! मग एक रुबाबदार दिसणारा माणूस स्विस एयरवेजचा शुभ्र पांढरा ड्रेस वगेरे घातलेला आला आणि त्यानी प्रवासी मोजायला चालू केलं. थोड्या वेळानी समजलं की प्रवाश्यांचा काउंट हा त्याच्या रिकॉर्ड मध्ये असलेल्या काउंटशी जुळत नाहीये. म्हणजे राहिलं वाटतं कोणी तरी खाली.. माझ्या मनात विचार.. च्यायला कोण पनवती आहे हा ? पण ५ मिनिटांनी विमान चालू झाले. मला खिड़कीची जागा मिळाली होती. विमान बराच वेळ रनवेवर फिरत राहिले. कधी नागमोडी कधी सरळ, इकडून तिकडे.. सरळ जायला लागल की वाटे आत्ता उड़ेल पण कुठच काय ? विमान खुप वेळ फिरून एक जागी जावून थांबल! हे काय? परत काय गडबड झाली की काय ? असा मनात विचार येत असतानाच विमान परत पुढे जाऊ लागले. पायलट ने गेअर बदललेले लक्षात आले. विमानाचा वेग आता खुप वाढला आणि बघता बघता प्रचंड वेगाने विमान आकाशात झेपावल! आणि क्षणार्धात रात्रीची झगमगणारी मुंबई मला दिसू लागली. माझ्या मातृभूमीचे हे ह्या वेळासाठीचे शेवटचे दर्शन!! सुन्दर अर्धचंद्राकृति दिसणारा तो मरीन ड्राइव्ह, रात्रीच्या दिव्यानी सजलेला तो वांद्रे वरळी सागर सेतू! डोळ्याआड़ जाईपर्यंत बघत होतो. हळूहळू मी आणि मुंबई ह्यांच्या मध्ये ढगांचा पड़दा आला. गुड बाय इंडिया....
आता मी विमानाच्या आत लक्ष देवू लागलो. माझ्या समोर एक स्क्रीन होती आणि माझ्या डाव्या हाताच्या आर्मरेस्ट खाली एक रिमोट होता. त्या रिमोट ची फ़क्त दोनच बटन दबता येत होती. prev आणि next. बाकीची बटन हॅन्डलच्या खाली होती. हे काय? काय कळेना.. बराच वेळ खटाटोप केल्यावर लक्षात आल की त्या आर्मरेस्टच्या बाजूला एक गुप्त बटन आहे ते दाबल की ते रिमोट आपोआप वर येत!! हे कळेपर्यंत दुबई निघून गेल होत! मग त्या TV वर थोडा टाइमपास करून मग मी झोपलो.
सकाळी ६ वाजता Zurich एअरपोर्ट वर आम्ही आलो. उतरण्याआधी सर्वांना स्विस चोकलेट दिली. मी माझे ते पँटच्या खिशात ठेवले. अमेरिकेला जाणारे विमान सुटायला अजून ५ तासाचा अवधी होता. ढगाळ हवा होती. परदेशात आल्याची पहिली जाणीव मला रेस्टरूम मध्ये गेल्यावर झाली!!! डिटेल्सची गरज नाही पण नको तिकडे वाट्टेल तितकं पाणी आणि हवं तिथे साधा एक वॉटरजेट नाही? काय घाणेरडा प्रकार! पण लक्षात आलं आता इथून पुढे सगळीकडे हे असंच, असो.
माझ्या पुढच्या फ्लाइटला ५ तासाचा अवधि होंता त्यामुले बराच वेळ मी Zurich एअरपोर्ट आणि (पुलंच्या भाषेत ) तिथली चालती बोलती प्रेक्षणीय स्थळ पाहत बसलो. माझी पुढची फ्लाईट स्विस एयरवेजचीच होती.. Zurich - JFK .. विमानात फक्त एकूण ४ इंडियन होतो बाकि सर्व गोरे लोक! विमान दिवसा १२ वाजता असल्याने ९ तासांचा प्रवास पूर्ण झगझगीत सूर्यप्रकाशात झाला. मला Emergency exit row मधली aisle सीट मिळाली होती, विमानात लंच दिला पण माझ्या सीटला ट्रे दिसेना.. च्यायला ही काय नवी कटकट? मी बराच प्रयत्न केल पण मला माझा ट्रे कुठेही दिसेना! शेवटी मी एयर होस्टेसला बोलावलं आणि तिने हँडलवरचं एक छोटंसं अगदी छोट, बटन दाबल आणि माझ्या आर्मरेस्ट खालून तो ट्रे जादुगाराच्या टोपितुन ससा निघावा तसा बाहेर आला ! त्या एयर होस्टेसने माझ्या कड़े बघून एक smile दिला आणि निघून गेली.. मी पण तिच्या कड़े लक्ष न देता समोर आलेल्या लंच वर focus केल . निवांत जेवलो, मस्त apple juice वगेरे घेतला आणि आता परत ते बटन दबला अन तो ट्रे काही आत जायला तयार नाही, बरेच प्रयत्न केले पण नाहीच! श्या.. परत एयर होस्टेस , परत तेच smile ..तिने एक बोटाने एक स्प्रिंग दाबली आणि झटकन तो ट्रे handle च्या आत गेला !!! पुन्हा तेच smile देत ती निघून गेली !
१० तासाच्या प्रवासानंतर दुपारी ४ ला न्यूयॉर्क JFK ला पोहोचलो. आत्तापर्यंत एकूण २१ तासाचा प्रवास झाला असल्याने खरच खूप कंटाळा आला होता आणी तिथे immigration च्या लाइनमध्ये १ तास ३० मिनिटे उभे राहून अगदी अंत पाहिल्यावर माझा एकदाचा नंबर आला. तेवढ्यात एक मुलगी माझ्या पुढे आली आणि पुढे घुसली मी काही बोलायच्या आत ती पोहोचली पण काउंटरपाशी!! मी मनात विचार केला.. ओके ladies फर्स्ट… बहुदा तिला कशाची तरी घाई असावी ! ५ min झाली पण ती काही काउंटरवरून हटेना. तिची आणि त्या ऑफिसरची काही तरी बाचाबाची झाली, ती पुढे निघून गेली म्हणुन मी काउंटर पुढे आलो तर तो ऑफिसर एकदम heavy bass effect असलेल्या त्याच्या आवाजात म्हणाला , "one at a time , I will call your name then come, step back" वाह, अमेरिकेतलं पहिलं स्वागत ! ती मुलगी काउंटर पुढेच घुटमळत होती , तो ऑफिसर तिला म्हणाला "I have asked you to go and see the authority, why you are standing here ? Don't waste my time, go !" छान , म्हणजे हा माणूस आधीच तापलाय आणि आत्ता आपण त्याच्या पुढे , all the best dude.. त्याने माझा पासपोर्ट आणि वीसा डोळे बारीक़ करत पहिला, त्याच्या कंप्यूटर वर काहीतरी टाइप केला आणि १-२ मिनट भयाण शांततेत गेल्यावर त्याने माझा पासपोर्ट परत केला with DS-94 i.e. Entry to USA is permitted! चला एक काम तरी झाल.. आता कस्टम ऑफिसर .. त्याने परत माझा वीसा चेक केला आणि काहीही न विचारता OK असा इशारा दिला आणि मी तिथून सुटलो.
बॅग्ज घेउन बाहेर आलो, आता मित्राला फ़ोन करायचा होंता की मी टॅक्सी घेउन येतोय तू घरीच रहा. तशी मी त्याला भारतात असतानाच आधीच कल्पना दिली होती पण आता पोहोचल्यावर फोन करा म्हणून मी माझा मोबाइल काढला , आणि पाहतो तर काय ? मी जे ग्लोबल calling कार्ड घेतल होंता (₹२०००/- देऊन ) त्यात बॅलन्सच नव्हता!! त्या कॉलिंग कार्ड वाल्यांनी तर सांगितलं होतं की तिथे जाऊन फोन ऑन करा लगेच नेटवर्क पकडेल, बॅलन्स तर आहेच तुमचा, लगेच वापरायला सुरवात करू शकता, इथे नेटवर्क तर आहे पण कॉल केलं तर बॅलन्स शून्य दाखवतोय. आता फ़ोन कसा करू? थोडा विचार केला, तिथल्या एक काउंटर वरून $१० भरून calling कार्ड घेतल , आणि पे फ़ोन पाशी गेलो . मला वाटल हे डेबिट कार्ड सारखा आहे आणि आता आपण हे कार्ड insert करून त्यातील balance असेपर्यन्त बोलू शकू पण पाहतो तर काय ? तिथे coin insert करायला slit नाही की कार्ड swipe करायला slot नाही, आता कॉल करू कसा ? तिथे आपला अड़ाणीपणा समोर आला, लोक माझ्या कड़े एवढा शिकला सवरलेला दिसतोय आणि साधा फ़ोन नाही लावता येत असा विचार करतात की काय असा मला वाटलं! जिथून ते कार्ड घेतल तिथली बाई कुठेतरी गेली होती.
शेवटी मी तिथे गस्त घालणाऱ्या एक पोलिस ऑफिसरला बोलवलं आणि मला ह्या नंबर वर ह्या कार्ड थ्रू कॉल करायचा आहे, हेल्प करा असा सांगितल. तिने ते कार्ड घेतल आणि अमेरिकेच्या झेंड्याची डिजाईन असते त्यावरून तिचे नख घासले आणि त्या मागे एक पिन कोड लपला होंता तो तिने ड़ायल केला. लाईन ओपन झाली आणि मग मित्राचा नंबर लावला, २ min च काम आणि मी २० मिनिट त्या फ़ोन बूथ वर खेळत होतो त्या फ़ोनशी , कधी फोन खाली बघ कधी वर, कुठे कॉइन टाकता येतो का, कुठे कार्ड टाकता येता का.. पण शेवटी एकदाचा बोलण झाल आणि त्या पोलिसला धन्यवाद देऊन मी तिथून exit च्या दिशेने चालू लागलो, १० मिनिट चालत गेलो तर एक अतिशय धिप्पाड कृष्णवर्णीय समोर आला आणि म्हणाला "where you want to go?" मला एकदम पुणे स्टेशन मधून बाहेर आल्यावर रिक्शावाले जसे अंगावर येतात त्याची आठवण झाली. अमेरिकेला जायच्या आधी बर्याचजणांनी अश्या लोकापासून सावध राहायला सांगितला होत. मी त्याला चुकवायला म्हटलं "No" आणि पटकन बाजूला असलेल्या रेस्टरूम मध्ये घुसलो :) थोड्या वेळाने डोकावून पाहिले तर तो निघून गेला होंता.. मी बाहेर पडलो आणि एअरपोर्टच्या एक्सिट मधून बाहेर आलो .. वाह.. २३ तासां नंतर नैसर्गिक हवा आणि सूर्यप्रकाश.. मी छाती भरून श्वास घेतला, आणि मनात म्हटलं..
शेवटी गाठली एकदाची अमेरिका !!!! Welcome to USA .....

Friday, June 24, 2016

माझा sky diving चा अनुभव



जिंदगी मिलेगी ना दोबारा हा चित्रपट मी २०११ मध्ये पहिला आणि तेव्हापासून sky diving करायची इच्छा मनात होती आणि ती पूर्ण होण्याचा योग मागच्या आठवड्यात आला. ह्यासाठी थोडी तयारी करावी लागली आणि हे सर्व तुमच्याशी शेअर करायचे आहे जेणेकरून ज्यांना हा अनुभव घायची इच्छा आहे त्यांना मदत होईल आणि ह्याच बरोबर जाणकार ह्या माहितीत त्यांची भर घालतील. हे लेख म्हणजे माझा अनुभव + टिप्स असा आहे.

पूर्वतयारी :
------------
माझी ही पहिलीच वेळ असल्याने मला Tandem जम्प हाच पर्याय होता. ह्यात तुमच्या बरोबर इन्स्ट्रक्टरपण उडी मारतो आणि तोच पॅराशूट वगैरे गोष्टी हाताळतो. सर्व प्रथम sky diving कोठे करावे आणि कोणाकडून करावे ही माहिती काढली. गूगलवर अनेक तास घालवून शेवटी ठिकाण आणि कंपनी निश्चित केली. हे ठरवताना पुढील गोष्टी लक्षात घेतल्या :

*. घरापासून त्या ठिकाणापर्यंत जायला लागणार वेळ : जितका कमी तितका बरं
*. किती वर्ष ती कंपनी हे काम करते आहे आणि अपघाताचा काही इतिहास आहे का ?
*. लोकांचे reviews आणि अनुभव : ह्यात महत्वाचे म्हणजे ताज्या (recent ) अनुभवाला जास्त महत्व.
*. किती पैसे ? Groupon सारख्या कुपन्स घेतात का ?
*. उड्डाण काही कारणास्तव रद्द झाल्यास काय पर्याय आहेत ? : उदा: पुन्हा दुसरा एखादा दिवस देतात की पैसे परत की कंपनी क्रेडिट की vouchers ?

हा सर्व विचार करून पॉईंट ऑफ एलिमिनेशनने शेवटी एक कंपनी ठरवली.

कधी करावे ?
---------------
दिवस आणि वेळ ठरवताना खालील मुद्दे विचारात घेतले :

*. त्या दिवसाचे हवामान : ढगाळ , पाऊस इ ची शक्यता असल्यास उड्डाण रद्द होण्याची भीती असते.
*. शक्यतो वीकडे कारण वीकेंडला प्रचंड गर्दी असल्याने ४-५ तास आपला नंबर येईपर्यंत वाट बघावी लागू शकते. वाट बघण्याची जागा ही हँगरच्या बाजूलाच असल्याने सतत विमानाचे मोठे आवाज , खायला / प्यायला फक्त छोटी व्हेंडिंग मशीन,  बसायला छोटे लाकडी बाक ह्यामुळे ४-५ तास वाट बघणे त्रासदायक होऊ शकते .
*. कुपन्स (जसे की Groupon ) वपणार असू तर त्याची मर्यादा उदा. काही कुपन्स फक्त वीकडेलाच / विशिष्ठ दिवशीच चालतात वगैरे.
*. थोड्या बातम्या वाचून बघाव्यात. एखाद्या नेत्याचा त्या भागात त्या दिवशी दौरा असल्यास सुरक्षिततेच्या कारणावरून एयर ट्रॅफिक कंट्रोल उड्डाण रद्द करू शकतात.
*. शक्यतो सकाळची वेळ घ्यावी कारण वातावरण चांगले असते , उन्हाचा तडाखा वाढलेला नसतो आणि गर्दी कमी असते त्यामुळे वाट बघण्यात वेळ जात नाही., शिवाय आपणही फ्रेश असतो.  ह्या उलट उशिराची वेळ घेल्यास उन्हामुळे दमल्यासारखे होऊ शकते शिवाय जेवण करू की नको, काय करू, हलकं की नॉर्मल , कधी करू, किती वेळ आधी करायचे इ. प्रश्न येतात.

एकदा दिवस आणि वेळ ठरल की मग पुढची तयारी !

त्या दिवशी :
--------------

*. आदल्या रात्री कमीत कमी ७-८ तास झोप घ्यावी. तुम्ही जर फ्रेश नसाल तर इतका सुंदर अनुभव एंजॉय करू शकणार नाही.
*. सकाळी शक्यतो हलका आणि कोरडा नाश्ता करावा. फ्री फॉलच्या वेळी पोटात खूप अन्न असेल किंवा खूप द्रव्य पदार्थ असतील तर उलटी येण्याची शक्यता असते आणि तसे झाले तर सगळ्या अनुभवाचा विचका होऊ शकतो.
* शक्यतो जीन्स आणि टी - शर्ट घालावा. बर्मुडा , ३/४ , ब्लॅझर , लूज फिटिंगचे शर्ट घालणे टाळावे. कारण सरळ आहे, ११००० फूट उंचीवरून घाली येणार हवा जवळ जवळ १६० kmph वेगाने तुमच्या अंगावर येणार असते. शिवाय हवेत तुम्ही गिरक्या खाण्याची शक्यता असते. फोटो काढायचे असल्यास हवेने फुगलेले लूज शर्ट , बर्मुडा अतिशय खराब दिसतं.    
* पायात स्पोर्ट शूज घालावेत. सँडल / फ्लोटर , चप्पल अजिबात वापरू नये.
* कमीत कमी मौल्यवान वस्तू असाव्यात. मी फक्त फोन, Govt. ID  आणि काही पैसे इतकंच घेऊन गेलो होतो. तिथे त्यांचे लॉकर्स असतात पण त्यासाठी पैसे  मोजायला लागतात शिवाय लॉकर्स अतिशय लहान असतात आणि शिवाय डुप्लिकेट किल्ली ही त्यांच्याकडे असतेच.
*. घरून निघण्याआधी फोन करून निश्चित करावे की आज आपली जम्प होणार आहे. बऱ्याचदा एयर ट्रॅफिक कंट्रोल कडून आलेली माहिती आपल्याला इंटरनेट वर उपलब्ध नसते.

इतके सगळे करून शेवटी तिथे पोहोचल्यावर पुढे काय ?

Aerodrome वर :
--------------------

 *. प्रथम आपण आलेलो आहोत हे पार्किंग मधून फोन करून कळवावे लागते. अश्या जागा तुलनेने छोट्या असतात आणि रनवे हा जवळच असल्याने एका  विशिष्ठ मर्यादेबाहेर आपल्याला स्वतःचे स्वतःच फिरत येत नाही. एयरपोर्ट ऑथॉरिटीचा माणूस आपल्याला घ्यायला त्यांच्या विशिष्ठ गाडीतून येतो. ID चेक केला जातो आणि मग फक्त त्याच्या गाडीतूनच आपल्याला हँगरमध्ये जाता येते.  एकदा तिथे पोहोचलो की आपल्याला चेक-इन करून घेतात आणि मग काही व्हिडिओ दाखवतात . त्यात sky diving मधले धोके कोणते आहेत उदा: विमानातील बिघाड , पॅराशूट मधील बिघाड इ. गोष्टी सांगितलेल्या असतात. हे सगळे बघून झाल्यावर आपल्याकडून अनेक फॉर्मवर सह्या करून घेतात . ह्या सगळ्या फॉर्म मध्ये साधारणपणे एकाच गोष्ट असते ती म्हणजे तुम्ही हे करताना मेलात तर आम्ही जबाबदारी नाही. आणि हे तुम्हाला मान्य आहे, करा सही !

*. सह्या करून झाल्यावर आपल्याला आपला इन्स्ट्रक्टर कोण आहे ह्याची माहिती दिली जाते. मग आपल्या इन्स्ट्रक्टर कडे जाऊन त्याची  ओळख करून देतात. माझा इन्स्ट्रक्टर विनोदी होता. कदाचित काही लोकांना टेन्शन आलेलं पाहून वातावरण हलकं फुलकं करण्यासाठी असे विनोद केले जात असावेत. थोडं खेळीमेळीचं वातावरण तयार झाल्यावर त्याने काय करायचे आणि काय करायचे नाही ह्या सूचना द्यायला सुरवात केली. ह्यात कसे बसायचे, कशी जम्प मारायची , हात कसे ठेवायचे इ. सांगितले. जम्प मारल्यावर फ्री फॉल दरम्यान वारा प्रचंड वेगाने वाहत असतो त्यामुळे बोललेले ऐकू येत नाही.  अश्या वेळी आपल्याला काही त्रास होत असल्यास कोणती खूण करायची, आल्याला मजा येत आहे हे सांगायला कोणती खूण करायची इ. सांगितले. काही त्रास होत असल्यास अगर भीती वाटत असल्यास इन्स्ट्रक्टर स्मूथ आणि लवकर लँडिंग करतो ह्या उलट आपल्याला मजा येत आहे आणि आणखी adventure हवं आहे तर तो आपल्याला उलट सुलट  करतो, गोल गोल फिरवतो किंवा ३६० अंशातून ( पाठ जमिनीकडे ) फिरवतो इ.

*. तोंडी सूचना देऊन झाल्या की मग छोटे प्रात्यक्षिक केले जाते. जसे की आता विमानाच्या दारात आहात , तर कश्या पद्धतीने बसणार ? उडी मारताना पाठीला कश्या पद्धतीने आधार द्यायचा ?  लॅन्ड होताना पाय कसे ठेवणार ?   तुमच्या परफॉर्मन्स वर इन्स्ट्रक्टर समाधानी झाला की मग तुम्हाला विमानाची बॅच सांगतात असे की तुम्ही ३ नंबर बॅचमध्ये जाणार इ. एकदा बॅच नंबर मिळाला की मग तो येईपर्यंत प्रतीक्षा करत बसावी लागते.      



विमानात :
------------

एकदाचा माझा नंबर आला आणि विमानात बसलो. हे छोटे विमान होते, ६ जम्प मारणारे आणि त्यांच्या बरोबर असणारे ६ इन्स्ट्रक्टर असे १२ लोकांना (+ पायलट) घेऊन जाणारे.  विमानाने हळू हळू अपेक्षित उंची गाठली



आणि पायलटने थंब्स अप केल्यावर विमानाचे दार उघडले. दार  उघडताच हवेचा एक  वेगवान झोत आत आला आणि त्याच्या आवाजाने बोललेले काहीच ऐकू येईनासे झाले . आता त्या शिकवलेल्या खाणाखुणा किती महत्वाच्या आहेत हे लक्षात आलं . एक एक करून प्रत्येक जण आपापल्या इन्स्ट्रक्टर बरोबर जम्प करत होता आणि माझा नंबर आला.



दरवाज्यात जाऊन शिकवल्या पॉसिशन मध्ये बसलो आणि एक नजर खाली टाकली . ११००० फूट उंचीवरून झाडे, नद्या, शेती अगदी खेळण्यातील वाटत होते. जोडीला भन्नाट , नव्हे सोसाट्याच्या वेगाने वाहणारा वारा आणि विमानाचा आवाज ... आणि एकदम पोटात गोळा आला. इन्स्ट्रक्टरने उडी मारायची की मागे फिरणार असे विचारणारी खूण केली. हे प्रत्येकालाच विचारतात आणि मागे फिरायची ही शेवटची संधी असते. moment of truth ! क्षणभर विचार आला , राहू दे नको उगाच रिस्क घ्यायला , पॅराशूट नाही उघडल तर ? पण मग  जिंदगी मिलेगी ना दोबारा मधला हा




  सीन आठवला आणि एकदम भीती कुठल्या कुठे पळून गेली. आणि मग  मी थंब्स अप ची खूण केली आणि इन्स्ट्रक्टरने रबर स्ट्रॅप घट्ट केले आणि "Now" असे ओरडला आणि सोबत "Don't forget to smile at the camera!" हे ही सांगितले. दुसऱ्या क्षणाला आम्ही विमानाबाहेर उडी मारली. आता पुढचे 50 सेकंद फ्री फॉल म्हणजे पॅराशूट न उघडता करायचा प्रवास !    

मी खाली येतोय असं वाटतंच नव्हतं. असा वाटत होत की आहे तिथेच तरंगतोय. इंस्ट्रक्टरने खूण करून कसा काय असा विचारलं आणि मी ऑल गुड ची खूण  केली , तसं त्याने असं काही केलं की मी (आम्ही ) गोल गोल , उलट सुलट गिरक्या घेऊ  लागलो आणि प्रचंड वेगाने येणारी हवा माझा आवाज, ओरडणे अगदी  दाबून टाकत होती. कान जवळ जवळ बंद झाले होते. क्षणात सूर्य क्षणात जमीन अश्या काही गिरक्या घेऊन थोडे स्थिर झाल्यावर कळलं खाली दिसणारी शेत जमीन आणि नद्या , डोंगर ह्यातील अंतर झपाट्याने वाढत आहे.







आणि हळू हळू माझ्या लक्षात आले की श्वास घेतला नाहीये. श्वास रोखून धरणे ह्या वाक्प्रचाराचा चांगलाच प्रत्यय मला येत होता.  अश्या वेळी  survival instinct नुसार मी मोठ्याने श्वास घ्यायला सुरवात केली , फुफ्फुसात जितकी हवा भरून घेता येईल तितकी घेण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि मग काही क्षणातच ह्या नवीन आणि सुंदर अनुभवाला सरावलो . माझे दोन्ही हात जे इतका वेळ छातीच्या बेल्टला घट्ट पकडून होते ते मी बाजूला केले  आणि पूर्ण सरळ करून एखाद्या पक्ष्यासारखा अनुभव घेऊ लागलो. आकाश जणू माझ्या बोटांच्या फटीतून एखाद्या म्हातारीच्या कापसासारखं निसटून जात होतं. मी त्या छोट्या दिसणाऱ्या नद्या, झाडे, पर्वत, शेती ह्या सगळ्याकडे जणू एक नव्या नजरेने बघू लागलो.  इतक्यात माझ्या खांद्याला जरा झटका बसला आणि मांडीला आवळलेल्या स्ट्रॅपनी ते तिथे असल्याची जाणीव करून दिली आणि प्रचंड वेगाने येणाऱ्या हवेचा झोत अचानक थांबला ! पॅराशूट उघडले होते (आणि कानही ). आता कसलाही आवाज नव्हता , सर्वत्र शांतता आणि मी अक्षरशः स्वप्नात असल्याप्रमाणे हवेत अलगद तरंगत होतो. इतक्यात मला माझ्या इंस्ट्रक्टरचा आवाज आला, त्याने माझा गॉगल थोडा ढिला करून सगळे ठीक आहे ना असा विचारले. मी हो म्हटल्यावर त्याने पॅराशूटची दोरी माझ्या हातात दिली.  डावीकडची दोरी खेचली की आम्ही डावीकडे वळत होतो आणि उजवीकडची खेचली की उजवीकडे. दोन्ही एकदम खेचल्या तर पॅराशूट एक दिशेने आणि खाली खाली येत होते. (हे सर्व जमिनीवर असतानाच सांगितलेले होते) पण प्रत्यक्ष हे करताना जणू आपण एखादा पक्षी आहोत आणि आपल्याला हवे तसे आपण उडत आहोत असे वाटू लागले. स्वातंत्र्य , स्वच्छंद , निसर्ग हे शब्द जणू मी अनुभवत होतो.





अश्यात जमिनीच्या जवळ कधी आलो ते कळलंच नाही. इंस्ट्रक्टरने पुन्हा पॅराशूटचा ताबा घेतला आणि लँडिंगसाठी योग्य पोसिशनमध्ये आणू लागला. मी खाली उभ्या असलेल्या लोकांकडे बघून हात हलवला आणि लोकांनी देखील हात हलवून प्रतिसाद दिला. खूप छान वाटले. बघता बघता आम्ही लँडिंग पॅडच्या जवळ येऊ लागलो. लँड करताना दोन्ही पाय सरळ ठेवायचे हे आधीच सांगितले होते. त्याप्रमाणे मी केले आणि एकदम स्मूथ लँडिंग झाले (लँडिंग ऑन हीप्स) आणि तिथे उभ्या असलेल्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. खरं तर त्या लोकांसाठी हे रोजचंच, पण त्या क्षणी त्या टाळ्या ऐकताना खूप भारी वाटलं. आपण एखादा पराक्रम गाजवून आलोय आणि हे लोक त्यासाठीच टाळ्या वाजवत आहेत असे वाटले. उठून उभा राहिलो, पुन्हा थोडे फोटो काढले




आणि अश्या रीतीने अनेक दिवस गाजत असलेला sky diving चे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले होते. डर के आगे जीत है असे वाटले.

sky diving धोकादायक आहे का ? हो नक्कीच , कारण तुम्ही विमानातून उडी मारत असता. मग हे कारण worth आहे का ? निर्णय आपला ,पण sky diving मध्ये दर वर्षी जितकी लोकं दगावतात त्यापेक्षा किती तरी पटीने जास्ती लोकं कार अपघातात दगावतात. मग कार चालवणे बंद करणार का ? मरायचेच असेल तर घरच्या घरी बाथरूममध्ये पाय घसरून डोक्याला लागून लोक दगावतात आणि मोठ्या भूकंपात लहान बालके वाचतात. शेवटी काय जिंदगी मिलेगी ना दोबारा हेच खरं !  Enjoy life whenever you can !!