आज जागतिकीकरणाच्या युगात अनेक जण आज पूर्वेकडील देशातून पश्चिमेकडील देशात आणि पश्चिमेकडील लोक पूर्वेकडच्या देशात विविध कारणामुळे येतात. अश्या वेगळ्या देशात आल्यावर आपल्याला अनेक फरक जाणवू लागतात. भौगोलिक, हवामान , भाषा इ. तर आहेच पण सर्वात महत्वाचा म्हणजे सांस्कृतिक फरक. ह्यात देखील पेहराव किंवा फ़क़्त दिखावू गोष्टींपलीकडे जाऊन विचार केला तर असं प्रश्न पडतो की हे असे का ?
उदाहरणार्थ : पश्चिमेकडील अमेरिका आणि पूर्वेकडील भारत घेऊ. त्यातही मुख्यत्वे ख्रिस्चन आणि हिंदू विचारसरणी ह्या संबंधी विचार करू.
अमेरिकेत जेवणाची पद्धत म्हणजे प्रथम starters मग maincourse मग dessert . त्यातपण शेफने जे बनवल असेल ते जवळ जवळ तसंच खावं लागता काही फार बदल न करता. फार फार तर तुम्ही वरून, मीठ, चीज किंवा pepper घेऊ शकता. पण standardization कडे कल असतो. जेवणाच्या सुरवातीलाच dessert कोणी खात नाही. हीच खायची योग्य पद्धत आहे असे लहानपणापासून बिंबवले जाते किंवा असेच जेवण जेवले पाहिजे. (This is the right way to satisfy your hunger)
उलट भारतीय थाळी घ्या. प्रथम गोड खा किंवा तिखट खा किंवा कोशिंबीर (सलाड ) खा किंवा इतर काही. तुमची मर्जी. रोटी भाजी बरोबर खा, दाल बरोबर खा , तीच दाल भाताबरोबर खा. हवं ते combination करा तुम्हाला आवडेल असं. मग एखादा भातात थोडी भाजी , थोडी दाल घेऊन खाईन तर दुसरा फ़क़्त भात आणी दाल खाईल, तिसरा आणखी कुठल्या पद्धतीने. बर आणी तीच चव पुन्हा येईल असं नाही. कारण कुठली गोष्ट किती प्रमाणात मिसळली आहे हे प्रत्येक जण आप आपल्या चवीनुसार ठरवतो. standardization नाही, तुम्हाला हव तसं , आवडेल तसं खा. इथे काय पदार्थ खाल्ले जातात हा मुद्दा नसून खाण्याची पद्धत हा मुद्दा आहे. (There is no right or wrong way, you decide your own way to satisfy your hunger)
आणखी एक उदाहरण , आपण पुस्तकांना पाय लागला तर नमस्कार करून क्षमा मागतो पण अमेरिकेत असं काही नाही. इथे कोण बरोबर कोण चूक हा मुद्दा नसून हे असं का हा मुद्दा आहे.
शाकाहार आणि मांसाहार हा तर अनादी काळापासून चर्चेचा मुद्दा आहे. सध्या जवळ जवळ सगळेच सर्व प्रकारचे पदार्थ खातात पण भारतात अजूनही मुक्या प्राण्यांना मारून खाणे बरोबर नाही असा मतप्रवाह आहे पण अमेरिकेत असं काही नाही. हवामान आणि अन्नाची उपलब्धतता हा वेगळा मुद्दा पण प्राण्यांना मारण्यावरून हा विचारांमधील फरक का ?
पाश्चात्य देशातील कोणतीही कंपनी घ्या. Company vision > Mission > Goals > Objectives अशी संगती दिसेल. Company vision म्हणजे promised land जिथे जाण्यासाठीचे अमुक अमुक नियम. हे नियम पाळा म्हणजे तुम्ही तिथे पोहोचाल. ह्याउलट आपल्याकडे असं काही का काही नव्हतं ?
तर हे असं का ह्याचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते कि एका विचारधारेतून एक तत्व जन्माला येते . माणसाचा ह्या तत्वावर विश्वास असतो आणि त्या विश्वासामुळे तो ठराविक पद्धतीचे आचरण करतो. Philosophy leads to beliefs and Belief leads to behavior . हा विश्वास हा माणसाची जडण घडण कशी झाली आहे ह्यावर अवलंबून असतो. ह्या जडण घडणीमध्ये लहानपणीचे संस्कार, अनुभव , वाचन , आजूबाजूची माणसे व त्यांचे विचार ह्यांचा वाटा असतो. वरील सर्व उदाहरणांमध्ये आचरणातील फरक दिसून येतो याचा अर्थ आपल्या आणी इतर लोकांच्या विश्वासात फरक आहे. म्हणजेच आपण जी तत्वे मानतो ती पाश्चिमात्य लोक जी तत्वे मानतात त्यापेक्ष्या वेगळी आहेत. तत्वे वेगळी आहेत कारण ज्या मूळ विचारधारातून ह्या तत्वांचा उगम झाला आहे त्या विचारधाराच भिन्न आहेत . आणी त्या 2 भिन्न विचारधारा म्हणजेच concept of monality vs duality !
Monality म्हणजे मी आणि ईश्वर एकचं आहे. अहम ब्रम्हास्मि. तुझ्यातही देव आहे आणी माझ्यातही आहे. तसाच तो इतर सर्वत्र आहे. प्राणी, झाडे इ. सजीव ह्याचबरोबर वह्या पुस्तके ह्यांना देखील देवाचे (सरस्वतीचे ) रूप मानले आहे. ह्याच बरोबर जन्म मृत्यूचे चक्र असून ह्यातून मुक्ती मिळवणे हेच अंतिम ध्येय आहे अशी विचारधारा आहे. याचाच अर्थ स्वर्ग आणी नर्क येथे तुम्ही काही काळापुरते राहता आणि पुन्हा जन्म मृत्युच्या चक्रात अडकता मोक्ष मिळेपर्यंत.
Duality म्हणजे देव (God )आहे ज्याने त्याचा दूत (Son of God) मनुष्यरुपात पृथ्वीवर पाठवला (Jesus) आणि त्याने नियम घालून दिले जे पाळल्याने आपण स्वर्गात (promised land) कडे जाऊ. म्हणजेच देव आणी त्याचा मनुष्यरुपात असलेला दूत ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. देवाने मनुष्याला विशेष क्षमता दिल्या आहेत, म्हणून तो इतर प्राण्यांच्यापेक्ष्या वरच्या स्तरात (superior) आहे . त्यामुळे आपल्याला मिळालेल्या किंवा देवाने दिलेल्या क्षमता वापरून जर आपण काही केले तर ते चालते हा समज आहे. त्याच बरोबर हा एकचं जन्म असून शेवटी आपण मिळवलेल्या गोष्टींवरून (sum of achievements) आपल्याला स्वर्ग (place of hero's)किंवा नर्क येथे कायमचे स्थान मिळते.
Duality नुसार जन्म हा एकचं आहे त्यामुळे जे काही करायचे ते परफेक्टच. 10 commandments नुसार तुम्ही हे नियम पाळा म्हणजे तुम्हाला स्वर्गात (promised land) कडे जाता येईल असे सांगितले आहे. म्हणजेच प्रत्येक गोष्ट बरोबर किंवा चूक, योग्य किंवा अयोग्य अश्या मध्ये वर्गीकरणाची वृत्ती दिसते. ह्या उलट Monality मध्ये देव तुझ्यातच आहे त्याचा शोध तुला स्वतःलाच घ्यायचा आहे असे सांगितले आहे. आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत अनेक जन्म घ्यावे लागतील. म्हणजेच आपण स्वतच ठरवायचे कि आपण कोणता मार्ग निवडायचा. ज्याने असं आवडेल तसा निवडावा. कोणी जंगलात जाऊन साधना करा , कोणी देवळात जाऊन करा, कोणी सर्वांबरोबर एकत्र प्रार्थना करा, कोणी घरच्या घरी करा. एक फॉर्म्युला नाही ज्याला जस आवडेल तस करा. शेवटी ध्येय एकचं. अश्या प्रकारे विचारधारेतून तत्व किंवा विश्वास तयार होतो. आणि त्यावरून माणूस स्वतःची वर्तणूक ठरवतो.
एकदा आपण हे सर्व समजून घेतलं की आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होतो. आत्ता पुन्हा वरील उदाहरणे पाहू.
१. जेवायचा हीच योग्य पद्धत आहे ज्यामुळे तुम्हाला जेवल्याचे समाधान मिळेल आणि याउलट तुम्हाला हव तसा जेवा, आवडेल तसे जेवा कारण तुमचा समाधान हे तुम्हीच शोधून काढायचा आहे तुम्हाला आवडेल त्या मार्गाने. इथे कोणताही एकचं योग्य मार्ग नाही.
२. पुस्तक म्हणजे सरस्वतीचे रूप. त्याला पाय लागला तर क्षमा ही मागितलीच पाहिजे. हाच भाव आपण जमिनीला पाय लावतो म्हणून जमिनीची किंवा पृथ्वीची क्षमा मागून दिवसाची सुरवात अनेकजण करतात. या उलट मनुष्याला देवाने बुद्धी दिली आहे आणी त्याचा वापर करून त्याने बाकीच्या गोष्टी निर्माण केल्या त्यामुळे त्या गोष्टींपेक्षा माणूस श्रेष्ठ आहे. ज्ञान हे माणसाच्या डोक्यात आहे पुस्तक हे फ़क़्त माध्यम आहे माणसानेच निर्माण केलेलं.
३. देव माझ्यात आहे तसाच प्राण्यातही आहे. त्यामुळे प्राणी मारणे योग्य नाही याउलट देवाचा दूत हा माणूस होता म्हणजे माणूस हा देवाला इतर प्रजातीन्पेक्ष्या प्रिय असून त्यामुळे तो इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि जगातील इतर गोष्टी ह्या माणसाच्या उपभोगासाठीच आहेत. त्यामुळे इतर प्राण्यांना खाणे यात गैर काहीच नाही. ह्यात कोण चूक कोण बरोबर हा मुद्दा नसून हे असं का हा आहे .
४. जन्म एकाच आहे त्यामुळे सर्व काही ताबडतोब झाले पाहिजे, ह्याच पद्धतीने झाले पाहिजे. त्यामुळे पूर्वीपासून तुम्ही ह्या जन्मात काहीतरी heroic असा केला पाहिजे तरच शेवटी तुम्हाला Elysium मध्ये म्हणजे अशी जागा जिथे देव सगळ्या hero किंवा ज्याने आयुष्यात काही तरी करून दाखवलंय अश्यांना स्थान देतो. या उलट आपल्याकडे एक नसून अनेक जन्म घ्यावे लागतात अशी विचारधारा आहे. त्यामुळे कमावलेले सगळे इथेच सोडून जायचे आहे , सोबत येतील ती फ़क़्त आपली कर्मे, त्यामुळे ह्या चक्रातून मुक्त व्हायचे असेल तर चांगली कर्मे करा. अनाठायी खर्च करू नये, कारण आपला जन्म कदाचित पुन्हा ह्याच घरात होऊ शकेल .
देवदत्त पटनाईक ह्यांनी ह्या बाबतीत एक छान किस्सा सांगितला होता. जेव्हा सिकंदर भारतावर स्वारी करणार होता त्या आधी त्याचा डेरा भारताच्या सीमेवर होता . सिकंदरला अनेक विजय तोपर्यंत मिळाले होते आणि त्याची इच्छया जग काबीज करायची होती. असाच तो एकदा रात्रीच्या वेळी आपल्या घोड्यावरून फेरफटका मारत असताना त्याला एक उघडा नागडा माणूस तळ्याकाठी आकाशाकडे बघत असलेला दिसला. त्याने त्या माणसाला विचारले कि तू काय करतोय ? तेव्हा त्या माणसाने उलट सिकंदरला विचारलं , तू काय करतोय ? तेव्हा सिकंदर म्हणाला मी इथे जग काबीज करतोय. तू काय करतोय ? तर तो माणूस म्हणाला मी स्वतःला काबीज करण्याचा प्रयत्न करतोय . आणी एवढे बोलून दोघेही हसायला लागले . हसण्याचं कारण ? पहिल्याला वाटला दुसरा मूर्ख आहे आणी दुसर्याला वाटला पहिला मूर्ख आहे. इथे मूर्ख खरतर कोणीच नाही. हा दोन विचार्धारामधील फरक त्यांच्या वर्तणुकीतून जाणवत होता. सिकंदरला वाटल, हा काय वेळ वाया घालवत बसलाय काहीही न करता ? ह्याचा जन्म हा फुकट घालवणार आणि त्या माणसाने विचार केला , जग जिंकून काय करणार? सगळ सोडून जायचं एक दिवस आणि स्वतःचा शोध नाही घेतला तर परत ह्या जन्म मृत्युच्या चक्रात फिरायचं, जग जिंकण्यात हा ह्याचा जन्म वाया घालवत आहे.
आता आपल्याला कळू शकेल की पाश्चात्य orchestra ला नोट्स आणी conductor का असतो (right way, follow the rule) आणि भारतीय संगीतात conductor नसतो . कलाकार त्याला रुचेल अश्या पद्धतीने वाजवतो (follow your own way) आणी त्यामुळेच पाश्चात्य संगीतातला performance ची पुनरावृत्ती होऊ शकते पण एखाद्या गायकाने अगर तबलजीने एखादी तान किंवा तुकडा हा एकमेवाद्वितीय असतो. त्या कलाकाराला देखील तसाच performance परत देत येइलच ह्याची १००% हमी नाही.
अमेरिकेतही पूर्वी शेतीसाठी बैल वापरले जायचे आणि भारतात तर आजही वापरले जातात पण बैल पोळा आपल्याकडेच का ?
पाश्चात्य उत्तर हो किंवा नाही , बरोबर किंवा चूक आणि आपल्याकडे असू शकेल (may be) व त्यातून उगम पावलेलं famous indian head shake ... पाश्चात्य लोक ह्यामुळे गोंधळतात ते का, ते आपल्याला आता कळेल आणि भारतीय लोक मुद्दाम असं करत नाहीत, ते नकळत होत, ते का हे सुद्धा आता लक्ष्यात येईल.
पाश्चात्य उत्तर हो किंवा नाही , बरोबर किंवा चूक आणि आपल्याकडे असू शकेल (may be) व त्यातून उगम पावलेलं famous indian head shake ... पाश्चात्य लोक ह्यामुळे गोंधळतात ते का, ते आपल्याला आता कळेल आणि भारतीय लोक मुद्दाम असं करत नाहीत, ते नकळत होत, ते का हे सुद्धा आता लक्ष्यात येईल.
कोणी म्हणेल हे सगळं जाणून घेऊन मला काय करायचं ? मला काय उपयोग ह्या असल्या गोष्टींचा ?
उपयोग आहे, नक्की आहे. जेव्हा तुम्ही ह्या दोन विचारधारा समजून घ्याल तेव्हा तुम्हाला कळू लागत कि समोरचा माणूस एका विशिष्ठ प्रकारे का वागत आहे ? आणी हे जाणून घेतल्याने आपण स्वतःच्यात आणी दुसर्या व्यक्तीतील फरकाचा आदर करू लागतो . माझे बरोबर तुझे चूक किंवा आपला मुद्दा ठासून सांगायची वृत्ती संपते कारण तुम्हाला लक्षात येत की कोणीतरी बरोबर किंवा चूक नाहीये. तर दोन वेगळ्या विचारधारांना मानणारे हे लोक असून दोघेही आपापल्या परीने बरोबर आहेत. हे जेव्हा आपल्या लक्षात येत तेव्हा जगण्यातली खरी गंमत कळू लागते.
टीप : ह्या लेखातील काही विचार देवदत्त पटनायक ह्यांच्या कर्तायात्रा ह्यावरून प्रेरित आहेत.