जिंदगी मिलेगी ना दोबारा हा चित्रपट मी २०११ मध्ये पहिला आणि तेव्हापासून sky diving करायची इच्छा मनात होती आणि ती पूर्ण होण्याचा योग मागच्या आठवड्यात आला. ह्यासाठी थोडी तयारी करावी लागली आणि हे सर्व तुमच्याशी शेअर करायचे आहे जेणेकरून ज्यांना हा अनुभव घायची इच्छा आहे त्यांना मदत होईल आणि ह्याच बरोबर जाणकार ह्या माहितीत त्यांची भर घालतील. हे लेख म्हणजे माझा अनुभव + टिप्स असा आहे.
पूर्वतयारी :
------------
माझी ही पहिलीच वेळ असल्याने मला Tandem जम्प हाच पर्याय होता. ह्यात तुमच्या बरोबर इन्स्ट्रक्टरपण उडी मारतो आणि तोच पॅराशूट वगैरे गोष्टी हाताळतो. सर्व प्रथम sky diving कोठे करावे आणि कोणाकडून करावे ही माहिती काढली. गूगलवर अनेक तास घालवून शेवटी ठिकाण आणि कंपनी निश्चित केली. हे ठरवताना पुढील गोष्टी लक्षात घेतल्या :
*. घरापासून त्या ठिकाणापर्यंत जायला लागणार वेळ : जितका कमी तितका बरं
*. किती वर्ष ती कंपनी हे काम करते आहे आणि अपघाताचा काही इतिहास आहे का ?
*. लोकांचे reviews आणि अनुभव : ह्यात महत्वाचे म्हणजे ताज्या (recent ) अनुभवाला जास्त महत्व.
*. किती पैसे ? Groupon सारख्या कुपन्स घेतात का ?
*. उड्डाण काही कारणास्तव रद्द झाल्यास काय पर्याय आहेत ? : उदा: पुन्हा दुसरा एखादा दिवस देतात की पैसे परत की कंपनी क्रेडिट की vouchers ?
हा सर्व विचार करून पॉईंट ऑफ एलिमिनेशनने शेवटी एक कंपनी ठरवली.
कधी करावे ?
---------------
दिवस आणि वेळ ठरवताना खालील मुद्दे विचारात घेतले :
*. त्या दिवसाचे हवामान : ढगाळ , पाऊस इ ची शक्यता असल्यास उड्डाण रद्द होण्याची भीती असते.
*. शक्यतो वीकडे कारण वीकेंडला प्रचंड गर्दी असल्याने ४-५ तास आपला नंबर येईपर्यंत वाट बघावी लागू शकते. वाट बघण्याची जागा ही हँगरच्या बाजूलाच असल्याने सतत विमानाचे मोठे आवाज , खायला / प्यायला फक्त छोटी व्हेंडिंग मशीन, बसायला छोटे लाकडी बाक ह्यामुळे ४-५ तास वाट बघणे त्रासदायक होऊ शकते .
*. कुपन्स (जसे की Groupon ) वपणार असू तर त्याची मर्यादा उदा. काही कुपन्स फक्त वीकडेलाच / विशिष्ठ दिवशीच चालतात वगैरे.
*. थोड्या बातम्या वाचून बघाव्यात. एखाद्या नेत्याचा त्या भागात त्या दिवशी दौरा असल्यास सुरक्षिततेच्या कारणावरून एयर ट्रॅफिक कंट्रोल उड्डाण रद्द करू शकतात.
*. शक्यतो सकाळची वेळ घ्यावी कारण वातावरण चांगले असते , उन्हाचा तडाखा वाढलेला नसतो आणि गर्दी कमी असते त्यामुळे वाट बघण्यात वेळ जात नाही., शिवाय आपणही फ्रेश असतो. ह्या उलट उशिराची वेळ घेल्यास उन्हामुळे दमल्यासारखे होऊ शकते शिवाय जेवण करू की नको, काय करू, हलकं की नॉर्मल , कधी करू, किती वेळ आधी करायचे इ. प्रश्न येतात.
एकदा दिवस आणि वेळ ठरल की मग पुढची तयारी !
त्या दिवशी :
--------------
*. आदल्या रात्री कमीत कमी ७-८ तास झोप घ्यावी. तुम्ही जर फ्रेश नसाल तर इतका सुंदर अनुभव एंजॉय करू शकणार नाही.
*. सकाळी शक्यतो हलका आणि कोरडा नाश्ता करावा. फ्री फॉलच्या वेळी पोटात खूप अन्न असेल किंवा खूप द्रव्य पदार्थ असतील तर उलटी येण्याची शक्यता असते आणि तसे झाले तर सगळ्या अनुभवाचा विचका होऊ शकतो.
* शक्यतो जीन्स आणि टी - शर्ट घालावा. बर्मुडा , ३/४ , ब्लॅझर , लूज फिटिंगचे शर्ट घालणे टाळावे. कारण सरळ आहे, ११००० फूट उंचीवरून घाली येणार हवा जवळ जवळ १६० kmph वेगाने तुमच्या अंगावर येणार असते. शिवाय हवेत तुम्ही गिरक्या खाण्याची शक्यता असते. फोटो काढायचे असल्यास हवेने फुगलेले लूज शर्ट , बर्मुडा अतिशय खराब दिसतं.
* पायात स्पोर्ट शूज घालावेत. सँडल / फ्लोटर , चप्पल अजिबात वापरू नये.
* कमीत कमी मौल्यवान वस्तू असाव्यात. मी फक्त फोन, Govt. ID आणि काही पैसे इतकंच घेऊन गेलो होतो. तिथे त्यांचे लॉकर्स असतात पण त्यासाठी पैसे मोजायला लागतात शिवाय लॉकर्स अतिशय लहान असतात आणि शिवाय डुप्लिकेट किल्ली ही त्यांच्याकडे असतेच.
*. घरून निघण्याआधी फोन करून निश्चित करावे की आज आपली जम्प होणार आहे. बऱ्याचदा एयर ट्रॅफिक कंट्रोल कडून आलेली माहिती आपल्याला इंटरनेट वर उपलब्ध नसते.
इतके सगळे करून शेवटी तिथे पोहोचल्यावर पुढे काय ?
Aerodrome वर :
--------------------
*. प्रथम आपण आलेलो आहोत हे पार्किंग मधून फोन करून कळवावे लागते. अश्या जागा तुलनेने छोट्या असतात आणि रनवे हा जवळच असल्याने एका विशिष्ठ मर्यादेबाहेर आपल्याला स्वतःचे स्वतःच फिरत येत नाही. एयरपोर्ट ऑथॉरिटीचा माणूस आपल्याला घ्यायला त्यांच्या विशिष्ठ गाडीतून येतो. ID चेक केला जातो आणि मग फक्त त्याच्या गाडीतूनच आपल्याला हँगरमध्ये जाता येते. एकदा तिथे पोहोचलो की आपल्याला चेक-इन करून घेतात आणि मग काही व्हिडिओ दाखवतात . त्यात sky diving मधले धोके कोणते आहेत उदा: विमानातील बिघाड , पॅराशूट मधील बिघाड इ. गोष्टी सांगितलेल्या असतात. हे सगळे बघून झाल्यावर आपल्याकडून अनेक फॉर्मवर सह्या करून घेतात . ह्या सगळ्या फॉर्म मध्ये साधारणपणे एकाच गोष्ट असते ती म्हणजे तुम्ही हे करताना मेलात तर आम्ही जबाबदारी नाही. आणि हे तुम्हाला मान्य आहे, करा सही !
*. सह्या करून झाल्यावर आपल्याला आपला इन्स्ट्रक्टर कोण आहे ह्याची माहिती दिली जाते. मग आपल्या इन्स्ट्रक्टर कडे जाऊन त्याची ओळख करून देतात. माझा इन्स्ट्रक्टर विनोदी होता. कदाचित काही लोकांना टेन्शन आलेलं पाहून वातावरण हलकं फुलकं करण्यासाठी असे विनोद केले जात असावेत. थोडं खेळीमेळीचं वातावरण तयार झाल्यावर त्याने काय करायचे आणि काय करायचे नाही ह्या सूचना द्यायला सुरवात केली. ह्यात कसे बसायचे, कशी जम्प मारायची , हात कसे ठेवायचे इ. सांगितले. जम्प मारल्यावर फ्री फॉल दरम्यान वारा प्रचंड वेगाने वाहत असतो त्यामुळे बोललेले ऐकू येत नाही. अश्या वेळी आपल्याला काही त्रास होत असल्यास कोणती खूण करायची, आल्याला मजा येत आहे हे सांगायला कोणती खूण करायची इ. सांगितले. काही त्रास होत असल्यास अगर भीती वाटत असल्यास इन्स्ट्रक्टर स्मूथ आणि लवकर लँडिंग करतो ह्या उलट आपल्याला मजा येत आहे आणि आणखी adventure हवं आहे तर तो आपल्याला उलट सुलट करतो, गोल गोल फिरवतो किंवा ३६० अंशातून ( पाठ जमिनीकडे ) फिरवतो इ.
*. तोंडी सूचना देऊन झाल्या की मग छोटे प्रात्यक्षिक केले जाते. जसे की आता विमानाच्या दारात आहात , तर कश्या पद्धतीने बसणार ? उडी मारताना पाठीला कश्या पद्धतीने आधार द्यायचा ? लॅन्ड होताना पाय कसे ठेवणार ? तुमच्या परफॉर्मन्स वर इन्स्ट्रक्टर समाधानी झाला की मग तुम्हाला विमानाची बॅच सांगतात असे की तुम्ही ३ नंबर बॅचमध्ये जाणार इ. एकदा बॅच नंबर मिळाला की मग तो येईपर्यंत प्रतीक्षा करत बसावी लागते.
विमानात :
------------
एकदाचा माझा नंबर आला आणि विमानात बसलो. हे छोटे विमान होते, ६ जम्प मारणारे आणि त्यांच्या बरोबर असणारे ६ इन्स्ट्रक्टर असे १२ लोकांना (+ पायलट) घेऊन जाणारे. विमानाने हळू हळू अपेक्षित उंची गाठली
आणि पायलटने थंब्स अप केल्यावर विमानाचे दार उघडले. दार उघडताच हवेचा एक वेगवान झोत आत आला आणि त्याच्या आवाजाने बोललेले काहीच ऐकू येईनासे झाले . आता त्या शिकवलेल्या खाणाखुणा किती महत्वाच्या आहेत हे लक्षात आलं . एक एक करून प्रत्येक जण आपापल्या इन्स्ट्रक्टर बरोबर जम्प करत होता आणि माझा नंबर आला.
दरवाज्यात जाऊन शिकवल्या पॉसिशन मध्ये बसलो आणि एक नजर खाली टाकली . ११००० फूट उंचीवरून झाडे, नद्या, शेती अगदी खेळण्यातील वाटत होते. जोडीला भन्नाट , नव्हे सोसाट्याच्या वेगाने वाहणारा वारा आणि विमानाचा आवाज ... आणि एकदम पोटात गोळा आला. इन्स्ट्रक्टरने उडी मारायची की मागे फिरणार असे विचारणारी खूण केली. हे प्रत्येकालाच विचारतात आणि मागे फिरायची ही शेवटची संधी असते. moment of truth ! क्षणभर विचार आला , राहू दे नको उगाच रिस्क घ्यायला , पॅराशूट नाही उघडल तर ? पण मग जिंदगी मिलेगी ना दोबारा मधला हा
सीन आठवला आणि एकदम भीती कुठल्या कुठे पळून गेली. आणि मग मी थंब्स अप ची खूण केली आणि इन्स्ट्रक्टरने रबर स्ट्रॅप घट्ट केले आणि "Now" असे ओरडला आणि सोबत "Don't forget to smile at the camera!" हे ही सांगितले. दुसऱ्या क्षणाला आम्ही विमानाबाहेर उडी मारली. आता पुढचे 50 सेकंद फ्री फॉल म्हणजे पॅराशूट न उघडता करायचा प्रवास !
मी खाली येतोय असं वाटतंच नव्हतं. असा वाटत होत की आहे तिथेच तरंगतोय. इंस्ट्रक्टरने खूण करून कसा काय असा विचारलं आणि मी ऑल गुड ची खूण केली , तसं त्याने असं काही केलं की मी (आम्ही ) गोल गोल , उलट सुलट गिरक्या घेऊ लागलो आणि प्रचंड वेगाने येणारी हवा माझा आवाज, ओरडणे अगदी दाबून टाकत होती. कान जवळ जवळ बंद झाले होते. क्षणात सूर्य क्षणात जमीन अश्या काही गिरक्या घेऊन थोडे स्थिर झाल्यावर कळलं खाली दिसणारी शेत जमीन आणि नद्या , डोंगर ह्यातील अंतर झपाट्याने वाढत आहे.
आणि हळू हळू माझ्या लक्षात आले की श्वास घेतला नाहीये. श्वास रोखून धरणे ह्या वाक्प्रचाराचा चांगलाच प्रत्यय मला येत होता. अश्या वेळी survival instinct नुसार मी मोठ्याने श्वास घ्यायला सुरवात केली , फुफ्फुसात जितकी हवा भरून घेता येईल तितकी घेण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि मग काही क्षणातच ह्या नवीन आणि सुंदर अनुभवाला सरावलो . माझे दोन्ही हात जे इतका वेळ छातीच्या बेल्टला घट्ट पकडून होते ते मी बाजूला केले आणि पूर्ण सरळ करून एखाद्या पक्ष्यासारखा अनुभव घेऊ लागलो. आकाश जणू माझ्या बोटांच्या फटीतून एखाद्या म्हातारीच्या कापसासारखं निसटून जात होतं. मी त्या छोट्या दिसणाऱ्या नद्या, झाडे, पर्वत, शेती ह्या सगळ्याकडे जणू एक नव्या नजरेने बघू लागलो. इतक्यात माझ्या खांद्याला जरा झटका बसला आणि मांडीला आवळलेल्या स्ट्रॅपनी ते तिथे असल्याची जाणीव करून दिली आणि प्रचंड वेगाने येणाऱ्या हवेचा झोत अचानक थांबला ! पॅराशूट उघडले होते (आणि कानही ). आता कसलाही आवाज नव्हता , सर्वत्र शांतता आणि मी अक्षरशः स्वप्नात असल्याप्रमाणे हवेत अलगद तरंगत होतो. इतक्यात मला माझ्या इंस्ट्रक्टरचा आवाज आला, त्याने माझा गॉगल थोडा ढिला करून सगळे ठीक आहे ना असा विचारले. मी हो म्हटल्यावर त्याने पॅराशूटची दोरी माझ्या हातात दिली. डावीकडची दोरी खेचली की आम्ही डावीकडे वळत होतो आणि उजवीकडची खेचली की उजवीकडे. दोन्ही एकदम खेचल्या तर पॅराशूट एक दिशेने आणि खाली खाली येत होते. (हे सर्व जमिनीवर असतानाच सांगितलेले होते) पण प्रत्यक्ष हे करताना जणू आपण एखादा पक्षी आहोत आणि आपल्याला हवे तसे आपण उडत आहोत असे वाटू लागले. स्वातंत्र्य , स्वच्छंद , निसर्ग हे शब्द जणू मी अनुभवत होतो.
अश्यात जमिनीच्या जवळ कधी आलो ते कळलंच नाही. इंस्ट्रक्टरने पुन्हा पॅराशूटचा ताबा घेतला आणि लँडिंगसाठी योग्य पोसिशनमध्ये आणू लागला. मी खाली उभ्या असलेल्या लोकांकडे बघून हात हलवला आणि लोकांनी देखील हात हलवून प्रतिसाद दिला. खूप छान वाटले. बघता बघता आम्ही लँडिंग पॅडच्या जवळ येऊ लागलो. लँड करताना दोन्ही पाय सरळ ठेवायचे हे आधीच सांगितले होते. त्याप्रमाणे मी केले आणि एकदम स्मूथ लँडिंग झाले (लँडिंग ऑन हीप्स) आणि तिथे उभ्या असलेल्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. खरं तर त्या लोकांसाठी हे रोजचंच, पण त्या क्षणी त्या टाळ्या ऐकताना खूप भारी वाटलं. आपण एखादा पराक्रम गाजवून आलोय आणि हे लोक त्यासाठीच टाळ्या वाजवत आहेत असे वाटले. उठून उभा राहिलो, पुन्हा थोडे फोटो काढले
आणि अश्या रीतीने अनेक दिवस गाजत असलेला sky diving चे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले होते. डर के आगे जीत है असे वाटले.
sky diving धोकादायक आहे का ? हो नक्कीच , कारण तुम्ही विमानातून उडी मारत असता. मग हे कारण worth आहे का ? निर्णय आपला ,पण sky diving मध्ये दर वर्षी जितकी लोकं दगावतात त्यापेक्षा किती तरी पटीने जास्ती लोकं कार अपघातात दगावतात. मग कार चालवणे बंद करणार का ? मरायचेच असेल तर घरच्या घरी बाथरूममध्ये पाय घसरून डोक्याला लागून लोक दगावतात आणि मोठ्या भूकंपात लहान बालके वाचतात. शेवटी काय जिंदगी मिलेगी ना दोबारा हेच खरं ! Enjoy life whenever you can !!
No comments:
Post a Comment