Search This Blog

Sunday, June 26, 2016

पुराणातील वांगी ?

आपल्याकडील काही लोक हे आपल्या पूर्वजांनी काय केले याचेच कौतुक करण्यात मग्न असतात . आपल्या पूर्वजांनी केले असेल भले, पण त्याचा आपण काहीही उपयोग करून न घेता किंवा त्यात काही भर न टाकता नुसतेच बडबड करत बसण्यात काय अर्थ आहे ? मला अशा लोकांचं खरच आश्चर्य वाटत. दुसर्यांनी केलेली प्रगती किंवा शोध याचे कौतुक करून आपल्या भारतात हे का नाही करू शकलो ह्याचा विचार करण्याऐवजी "काय त्यात एवढं , हे तर भारतात १००० वर्षांपूर्वीच होत" अस म्हणण्यात कसला अभिमान ?
आपण काही उदाहरणे बघू ज्यात अ म्हणजे एखादा शोध किंवा तंत्रज्ञान आणि ब म्हणजे वरील प्रकारच्या लोकांकडून आलेल्या प्रतिक्रिया व माझी प्रतिक्रिया :
अ : अणूबॉम्बचा शोध
ब : हें , आपल्याकडे आग्नेयास्त्र होत पूर्वी. महाभारतात वापर केला होता. कुरुक्षेत्रावर अजून काहीही उगवत नाही !!!
मी : असू शकेल , पण आपण त्या तंत्रज्ञानाचा आजच्या वापरासाठी काय उपयोग केला ? आजही आपण अनेक शस्त्रास्त्रे रशियासारख्या देशाकडून आयात करतो आणि करोडो रुपये यावर दर वर्षी खर्च होतात . भारताच्या अणूविषयक कार्यक्रमासाठी युरेनियम बाहेरून आयात करतो , reactors आयात करतो. मग आपल्याकडील ह्या पूर्वजांकडील ज्ञानाचा नुसताच बढाई मारून काय फायदा ?
अ : विमान
ब: आपल्याकडे विमानाचा शोध प्रथम लागला , अमेरिकेत नाही . रामायणापासून उल्लेख आहे विमान वापरल्याचा . vimanas नावाची एक documentary पण आहे त्यावर.
मी : ठीक आहे , पण आज आपल्या भारताची काय स्थिती आहे ? करोडो रुपये खर्चून आपण आज फ्रांसकडून विमाने विकत घेत आहोत. विमानाची technology जर आपल्याकडे आधीपासून होती तर पण आपण आज त्याचा आपल्या देशासाठी काय उपयोग करून घेतला ?
अ : प्रोग्रामिंग
ब : आपली संस्कृत प्रोग्रामिंगसाठी बेस्ट आहे असे नवीन संशोधन झाले आहे. आपल्याकडे हे आधीपासूनच आहे, हे C /C ++ वगैरे आत्ताच आहे.
मी : आपण जे बोललात त्यातच सगळ आलं. संस्कृत हि आपली भाषा , ती प्रोग्रामिंगसाठी चांगली हे आपल्याला पाश्च्यात्त देशातील लोकांनी सांगितल्यावर आपल्याला कळते ? संस्कृत प्रोग्रामिंगसाठी वापरता येईल कि नाही तो भाग वेगळा , पण तिकडचे लोक आपल्या संस्कृतवर संशोधन करून जगाला सांगतात आणि आपण फ़क़्त हो हो बघा आम्ही किती भारी , आमची संस्कृत किती भारी असे म्हणत बसण्यातच धन्यता मानतो. मग तिकडचाच कोणीतरी त्यावर अधिक संशोधन करतो आणि patent मिळवून ते तंत्रज्ञान आम्हालाच विकतो.
अ: शस्त्रक्रिया / एखादं नवीन मशीन किंवा तंत्र
ब : आपल्या भारतात सुश्रुताने हजारो वर्षांपूर्वी अमुक तमुक इतकी अवघड शस्त्रक्रिया केली होती. आपल्या भारतात हि गोष्ट तेव्हापासूनच माहीत होती . हे इतक्या वर्षांनी शोधून काढलं या पाश्च्यात्त लोकांनी .
मी : आपल्याला माहित होतं ना आधीपासून पण सध्या आपण त्याचा काय फायदा करून घेतोय ? आज भारत अनेक औषधे , मशिन्स , medical parts परदेशातून आयात करतो . operation करण्यासाठी डॉक्टरनी भारतीय part X रुपयांना आणी परदेशी पार्ट ८X रुपयांना असे सांगितल्यावर कितीतरी जण महाग असूनही परदेशी पार्ट वापरा असं सांगतात. कदाचित भारतीय पार्ट चांगला असेलही , पण quality बाबतीत तो विश्वास वाटत नाही. याची कारणे अनेक असू शकतील जसे कि परदेशी कंपन्यांचे aggressive मार्केटिंग वेगैरे पण शेवटी भारतातील पैसा बाहेर जातो आहे हे सत्य राहतेच. मग सुश्रुताने हजारो वर्षांपूर्वी अमुक तमुक इतकी अवघड शस्त्रक्रिया केली होती याचा आपल्याला सध्या काय उपयोग झाला ?
मला भारताला किंवा आपल्याकडील प्रत्येक गोष्टींना नावं ठेवायची नाहीत. परवाची इस्रोची कामगिरी बघून खूप अभिमान वाटला. किती तरी अमेरिकन मित्रांना हे माझ्या भारतातील संशोधकांनी करून दाखवलं अस मी अभिमानाने सांगितलं. मोदींचा "स्वच्छ गंगा " प्रोजेक्ट , पूर्वीपासून आपण नद्यांना पूजनीय मानत आलो आहोत आणी आता तिच्या सफाईसाठी प्रयत्न करतो आहोत ही खूप चांगली गोष्ट आहे. आपल्याकडे अगदी सम्राट अशोकाच्या काळापासून चर खणणे, बांध घालून पाणी जिरवणे ह्या गोष्टी केल्या जायच्या, सध्या महाराष्ट्रात राबवली गेलेली "जलयुक्त शिवार योजना " आणी त्यामुळे वर्धा आणी नागपूर येथे मुबलक उपलब्ध झालेले पाणी हे चर खणणे, बांध घालून पाणी जिरवणे ह्यामुळेच शक्य झाले.
आपल्याकडे असलेले पुराणातील ज्ञान आपण वापरून आज आपला उत्कर्ष कसा होईल हे पाहीले तर त्या ज्ञानाचा सदुपयोग झाला असे म्हणता येईल . दुसर्यांनी केलेल्या कष्टांमूळे लागलेले शोधांच क्रेडीट ज्याचं त्याला देऊन आपल्याला काय करता येईल ह्याचा विचार न करता नुसतेच आमचे पूर्वज असे होते आणी आपल्याकडे अमुक तमुक आधी पासूनच होते असं म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात काय अर्थ आहे ?

No comments: